Aurangabad: विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेल्या अंबादास दानवेंचं औरंगाबादेत जंगी स्वागत
Ambadas Danve: औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करताच अंबादास दानवे यांच्या जंगी स्वागताला वैजापूरमधून सुरवात झाली आहे.
Aurangabad News: एकीकडे राज्यात शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झाला असताना, दुसरीकडे त्याच दिवशी विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांची निवड करण्यात आली आहे. तर दानवे आज औरंगाबादला परतले असतांना शिवसैनिकांकडून त्यांचे ठीक-ठिकाणी जंगी स्वागत करण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करताच अंबादास दानवे यांच्या जंगी स्वागताला वैजापूरमधून सुरवात झाली आहे.
अंबादास दानवे वैजापूरमध्ये दाखल होताच शिवसैनिकांकडून ढोल-ताशे वाजवत दानवे यांचे स्वागत करण्यात आले. सोबतच जोरदार आतिषबाजी सुद्धा करण्यात आली आहे. तर शिवसैनिकांनी भला मोठा हार जेसीबीच्या मदतीने दानवे यांना घातला. काही कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण सुद्धा केली. जय भवानी जय शिवाजी, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, शिवसेना जिंदाबाद अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
शहरात सुद्धा जोरदार तयारी...
शिवसेनेत झालेल्या बंडात औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक आमदारांचा समावेश आहे. अशा काळात अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटात मोठा उत्सवाचे वातावरण आहे. त्यामुळे दानवे यांच्या स्वागतासाठी औरंगाबाद शहरात सुद्धा जोरदार तयारी शिवसैनिकांकडून करण्यात आली आहे. वैजापूरहून गंगापूर आणि त्यांनतर वाळूजमार्गे दानवे शहरात दाखल होतील. त्यामुळे शहरातील क्रांती चौकात दानवे यांचे जंगी स्वागत केले जाऊ शकते.
दानवेंची भाजपवर टीका...
औरंगाबादमध्ये दाखल झालेले दानवे 'एबीपी माझा'शी बोलतांना म्हणाले की, प्रादेशिक पक्षांसोबत सत्ता स्थापन करून, त्यांनतर त्याच पक्षाला संपवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचं आरोप अनेक पक्षाच्या प्रमुखांनी केला आहे. त्यामुळे भाजपचे हेच धोरण आहे. महाराष्ट्रातील काही जण म्हणत आहेत की, आम्ही उठाव केला आहे. पण हा उठाव नसून यांना कळत नाही की यांना भाजपने फोडले आहे. बिहारचे भाजप नेते सुशील मोदी यांच्या विधानाने भाजपचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे वेगळे होते हे आता स्पष्ट झाले असल्याचं दानवे म्हणाले.