शिंदे गटातील आमदाराच्या मुलाकडून व्यावसायिकाला हातपाय तोडण्याची धमकी; पाहा संपूर्ण संभाषण
Aurangabad: वाढदिवसाच्या पार्टीचं बिल मागणाऱ्या एका केटरिंग व्यावसायिकाला आमदार शिरसाट यांच्या मुलाने चक्क हातपाय तोडण्याची धमकी दिली आहे.
Aurangabad News: आधीच भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे शिंदे गटातील पाच आमदार अडचणीत आले असतानाच, आता औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण वाढदिवसाच्या पार्टीचं बिल मागणाऱ्या एका केटरिंग व्यावसायिकाला शिरसाट यांच्या मुलाने चक्क हातपाय तोडण्याची धमकी दिली आहे. विशेष म्हणजे याबाबत एक कथित ऑडीओ क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ज्यात शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाठ यांच्याकडून केटरिंग व्यावसायिक त्रिशरण गायकवाड यांना धमकी देण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
आमदार शिरसाट यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 2017 ला एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीसाठी केटरिंग व्यावसायिक त्रिशरण गायकवाड यांना ऑर्डर देण्यात आली होती. ऑर्डरसाठी साडेचार लाख रुपये देण्याचा दोघांमध्ये ठरलं होते. पार्टी झाल्यावर पुढे काही रक्कम शिरसाट यांनी गायकवाड यांना दिली. पण उरलेल्या रकमेसाठी खूप त्रास देण्यात आल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. अनकेदा पैसे मागितले असता काहीतरी डिस्काऊंट कर म्हणत उरलेल्या पैश्यातून 75 हजार रुपये कमी केले. तसेच उरलेले 40 हजार देण्याचे कबूल केले. पण जेव्हा पैसे आणण्यासाठी गायकवाड शिरसाट यांच्या कार्यलयात गेले तेव्हा फक्त 20 हजारच देण्यात आले. जेव्हा गायकवाड यांनी शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाठ यांना फोन करून पैसे मागितले तेव्हा त्यांनी त्यांना हातपाय तोडण्याची धमकी देल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.
संपूर्ण संभाषण ( कथित ऑडीओ क्लिप)
त्रिशरण गायकवाड: 40 हजारबाबत साहेबांसमोर बोलणं झाले, पण बाहेर आल्यावर 20 हजारच दिले मला
सिद्धांत शिरसाठ: साहेबांनी जेवढे सांगितले तेवढेच दिले, आता याच्यापुढे नाही भेटत
त्रिशरण गायकवाड: काय झालं भाऊ...
सिद्धांत शिरसाठ: साहेबांनी जेवढे दिले, तेवढे दिले, विषय संपला आता
त्रिशरण गायकवाड: भाऊ अजून वीस हजार बाकी आहे ना भाऊ
सिद्धांत शिरसाठ: दिमाक खराब करायचा नाही आता
त्रिशरण गायकवाड: भाऊ कामाचे पैसे बाकी आहे तुमच्याकडे, असे नका ना करू....तुम्हाला 75 हजार तुमच्या एका शब्दावर वापस केले मी
सिद्धांत शिरसाठ: उपकार केले ना तू
त्रिशरण गायकवाड: भाऊ तशी नका भाषा वापरू, कामाचे पैसे आहे, तेवढे देऊन टाका
सिद्धांत शिरसाठ: कोणत्या कामाचे पैसे आहे रे तुझे
त्रिशरण गायकवाड: त्याच कामाचे बाकी राहिले जे 40 हजार... एक लाख 25 हजार होते, तुमच्या शब्दावर आपण 75 हजार डिस्काऊंट केले
सिद्धांत शिरसाठ: तू आता डोक्याच्या वर झाला बर का....आता तू येच साहेबांच्या समोर तुला 20 हजार देऊन टाकले
त्रिशरण गायकवाड: साहेब 40 हजार बोलले होते, बाहेर आल्यावर मला 20 हजारच दिले
सिद्धांत शिरसाठ: तेव्हा बोलला नाही, तू का बरं तोंड नाही खोललं तेव्हा
त्रिशरण गायकवाड: परत यावे लागेल मग ऑफिसवर मग काय करता
सिद्धांत शिरसाठ: परत आला तर तिथच हातपाय तोडतो तुझे
त्रिशरण गायकवाड: भाऊ असे नका ना बोलू तुम्ही
सिद्धांत शिरसाठ: असं नका बोलू म्हणजे
त्रिशरण गायकवाड: आता कामाचे पैसे आहेत, तेवढे देऊन टाका
सिद्धांत शिरसाठ: कोणाचे देने आहे, कुठे आहे तू आता
त्रिशरण गायकवाड: घरी होतो
सिद्धांत शिरसाठ: थांब येतो तिथे