Aurangabad News: बायकोला शिट्ट्या मारायचा म्हणून गल्लीतील तरुणाचा घेतला जीव, औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील घटना
Aurangabad Crime News: पोलिसांच्या तपासात बिबट्याचा हल्ला (Leopard Attack) नसून, या तरुणाची हत्या (Murder) करण्यात आल्याचे समोर आले आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबादच्या (Aurangabad) सिल्लोड तालुक्यातील रेलगाव येथे शेतात पार्टीसाठी करण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याने मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली. मात्र पोलिसांच्या तपासात बिबट्याचा हल्ला (Leopard Attack) नसून, या तरुणाची हत्या (Murder) करण्यात आल्याचे समोर आले आहे. मयत तरुण हा आरोपीच्या बायकोला पाहून शिट्टी मारून वाईट नजरेने पाहत असल्याने त्याने त्याचा जीव घेतला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. रविंद्र अंबादास (वय 28 वर्षे) असे मयत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेलगाव येथील घटनेतील मयत रवींद्र काजले हा आरोपी रमेश (नाव बदलेले) याच्या बायकोला गल्लीतून जाता येता वाईट नजरेने बघत होता. तिच्याकडे पाहून शिट्ट्या मारत होता. रमेशने त्याला अनेक वेळा समजावून सांगितले. परंतु रवींद्र काजलेच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. उलट त्याने रमेशला उद्धट भाषा वापरली. त्यामुळे याचा राग त्याला आला होता.
छेड काढणाऱ्या रवींद्रचा काटा काढला...
बायकोची नेहमी छेड काढणाऱ्या रवींद्रचा काटा काढण्याचं रमेशने ठरवलं होते. त्यामुळे याची तो संधी शोधत होता. दरम्यान याचवेळी 1 जानेवारी रोज रवींद्र हा गव्हाला पाणी देण्यासाठी आणि पार्टी करण्यासाठी घरातून भाकरी मटण घेऊन दुचाकीने (क्र. एमएच 20 - डीवाय 0585) रात्री 10 च्या सुमारास शेताकडे निघाला होता. यावेळी त्याला रस्त्यात रोखून रमेश याने लिफ्ट मागितली आणि रस्त्यात चाकूने हल्ला करून त्याचा खून केला.
घटना अशी आली उघडकीस...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी रोजी रविवारी सायंकाळी रवींद्र, त्याचा मोठा भाऊ आणि अन्य एका मित्राने गावाजवळील एका शेतात पार्टी करण्याचं नियोजन केले होते. संध्याकाळी सात वाजता रवींद्र आपल्या दुचाकीवरून पार्टीसाठी ठरलेल्या शेताकडे जाण्यासाठी निघाला. त्यापाठोपाठ त्याचा मोठा भाऊ व त्याचा मित्र देखील शेताकडे जाणार होते. दरम्यान याचवेळी गावाजवळील माणकाई रस्त्यावरील खड्ड्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची त्यांना माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांना रवींद्रचा मृतदेह आढळून आला. तर बिबट्याच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज यावेळी ग्रामस्थांनी वर्तवला होता. मात्र पोलिसांनी तपास केला असता घटनास्थळी कुठेच बिबट्याच्या पायाचे ठसे मिळून आले नाही. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तपासाचे चक्रे फिरवली. ज्यानंतर हा खुनाचा प्रकार असल्याचं समोर आले आहे.