औरंगाबादकरांची चिंता वाढली! जिल्ह्यात 'स्वाइन फ्लू'च्या रुग्णांमध्ये वाढ; शहरासह ग्रामीण भागात 12 रुग्ण
Aurangabad News: जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची वाढ होत असल्याने डॉक्टरांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
Aurangabad News: कोरोनातून बाहेर येत नाही तो आता 'स्वाइन फ्लू'ने (Swine Flu Causes) औरंगाबादकरांची चिंता वाढवली आहे. जिल्ह्यातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या 12 वर गेली आहे. यात 3 रुग्णांना सुटी देण्यात आली आहे, तर 9 रुग्णांवर उपचार सुरू आहे. पावसाळा सुरु असल्याने जिल्ह्यात सध्या सर्दी, खोकल्याच्या रुग्णांचेही प्रमाणही वाढले आहे. त्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
तीन वर्षांच्या कोरोनाच्या (Coronavirus) धुमाकूळनंतर अजूनही जिल्ह्यात रोज नवीन रुग्ण आढळून येत आहे. त्यात पावसाळा सुरु असल्याने सर्दीचे रुग्ण वाढत आहे. अशात आता स्वाइन फ्लूच्या रुग्णांची वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आतापर्यंत 12 रुग्ण आढळले आहेत. यात शहरातील 7 रुग्णांचा समावेश आहे. तर औरंगाबाद तालुक्यातील एक, पैठण येथे एक आणि वैजापूर येथे 2 रुग्णांचे निदान झाले. तर अन्य जिल्ह्यांतील एका रुग्णावर उपचार सुरू आहे. विशेष म्हणजे यात दोन डॉक्टरांचा समावेश असून, ते होम आयसोलेशनमध्ये आहेत.
अशी घ्या काळजी...
जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची वाढ होत असल्याने डॉक्टरांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जसे की, साबण आणि स्वच्छ पाण्याने वारंवार हात धुणे. पौष्टिक आहार, लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या अशा आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करावे. तसेच खोकला, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी, घसादुखी, घशाला खवखव, ताप, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तात्काळ डॉक्टरांना दाखवून घ्यावे.
कोरोनाचे 11 रुग्ण वाढले...
औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नसल्याने दिलासा मिळाला होता. मात्र मंगळवारी पुन्हा 11 नवीन रुग्ण आढळून आली आहे. ज्यात ग्रामीण भागातील 3 आणि शहरातील 8 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 7 रुग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात सद्या एकूण 38 सक्रीय रुग्ण आहेत.
लसीकरणाचा टक्का पुन्हा घसरला...
कोरोनाच्या रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होत असल्याने प्रशासनाकडून लसीकरणावर (Coronavirus Vaccine) भर दिला जात आहे. मात्र असे असतांना जिल्ह्यातील लसीकरणाच्या टक्केवारीत काही वाढ होतांना दिसत नाही. सद्या जिल्ह्यातील 30 लाख 43 हजार 808 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर 23 लाख 72 हजार 275 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 2 लाख 22 हजार 900 नागरिकांनी आतापर्यंत तिसरा म्हणजेच बुस्टर डोस घेतला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लसीकरणाच्या टक्केवारीत वाढ करण्याचे प्रशासनासमोर मोठं आव्हान असणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या उपयायोजना सुद्धा प्रशासन राबवत आहे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )