(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Shirsat: मी नाराज नाही, मुख्यमंत्र्यांच्या स्नेहभोजनाला जाणार; संजय शिरसाट यांचा खुलासा
Aurangabad : याबाबत खुद्द आमदार शिरसाट यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना मुख्यमंत्र्यांच्या स्नेहभोजनाला जाणार असल्याचा खुलासा केला आहे.
Aurangabad News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी शिंदे गट व भाजपच्या सर्व आमदारांसाठी आज स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. परंतु या स्नेहभोजनाला शिंदे गटाचे बहुचर्चित असलेले आमदार संजय शिरसाट जाणार नसल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत खुद्द आमदार शिरसाट यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना मुख्यमंत्र्यांच्या स्नेहभोजनाला जाणार असल्याचा खुलासा केला आहे. तसेच आपली कसलीही नाराजी नसल्याचं सुद्धा आमदार शिरसाट म्हणाले आहे.
याबाबत बोलतांना शिरसाट म्हणाले आहे की, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाचा कार्यक्रमाला जाणार नसल्याने मी नाराज असल्याच्या बातम्या सर्वत्र चालत आहे. पण नाराजीचं कोणतेही कारण नाही. दोन दिवसांपूर्वीचं मी मुख्यमंत्री यांच्या बंगल्यावर गेलो होतो. तिथे गणपतीचे दर्शन करून,जेवण सुद्धा केलं. त्यामुळे आज जाणार नव्हतो, मात्र मी नाराज असल्याच्या बातम्या सुरु असल्याने मला जावे लागणार आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांच्या स्नेहभोजनाला मी जाणार असल्याचं शिरसाट म्हणाले आहे.
पुन्हा शिरसाट यांच्या नाराजीची चर्चा...
शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात आमदार संजय शिरसाट यांचे नाव निश्चित समजले जात होते. मात्र ऐनवेळी त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे शिरसाट नाराज असल्याची चर्चा आहे. तर खुद्द शिरसाट यांनी मंत्रीपदाची संधी हुकल्याची खंत जाहीरपणे बोलावून दाखवली आहे. त्यात आजच्या मुख्यमंत्र्यांच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी आपण जाणार नसल्याचा शिरसाट यांनी निर्णय घेतल्याने त्यांच्या नाराजीची पुन्हा चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे नाराजीची चर्चा पाहता त्यांनी आपला निर्णय बदलत, संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे.
असा आहे मुख्यमंत्र्यांच्या घरी कार्यक्रम...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वर्ष बंगल्यावर आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात पहिल्या टप्प्यात राज्यातील महत्वाचे अधिकारी हे मुख्यमंत्री यांच्या घरी असलेल्या गणपतीचे दर्शन घेतील, त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम असेल. तर दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत सर्वच आमदार आणि खासदार यांच्यासाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचं बोलले जात आहे.