Aurangabad: 'त्या' बॅडमिंटनपटूसाठी इतिहासात पहिल्यांदाच खंडपीठाने स्वातंत्र्यदिनी घेतली सुनावणी
Aurangabad: ध्वजवंदन केल्यावर न्यायमूर्ती रवींद्र घुगे, अरुण पेडणेकर यांनी प्रथमेशच्या वडिलांच्या याचिकेवर 15 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता सुनावणी घेतली.
Aurangabad News: अनेक महत्वाच्या सुनावणीसाठी उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्याचं आपण पाहिले आहे. मात्र इतिहासात पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनी औरंगाबादच्या खंडपीठाने सुनावणी घेतल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या सुनावणीमुळे संघटनेने संधी नाकारलेल्या एका होतकरू खेळाडूला न्याय मिळाला आहे. तर हा बॅडमिंटनपटू वाइल्ड कार्डद्वारे पुणे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तसेच नागपूरला खेळण्यास पूर्णत: पात्र असल्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
काय आहे प्रकरण...
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरलेला शहरातील राष्ट्रीय बॅडमिंटन पटू प्रथमेश प्रकाश कुलकर्णी याचे नाव बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडियाच्या गलथानपणामुळे 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी समाविष्ट होऊ शकले नाही. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने सुरवातीला त्याचे नाव महिला गटात समाविष्ट केले. त्यांची चूक निदर्शनास आणून दिल्यानंतर महिला खेळाडूंच्या यादीतून नाव काढले पण पुरुष खेळाडूंच्या यादीत मात्र त्याचे नाव समाविष्ट करण्यातच आले नाही.
याचिकेवर स्वातंत्र्यदिनी सुनावणी
तशी स्वातंत्र्यदिनी सार्वजनिक सुटी असल्याने खंडपीठ बंद असते. मात्र ध्वजवंदन केल्यावर न्यायमूर्ती रवींद्र घुगे, अरुण पेडणेकर यांनी प्रथमेशच्या वडिलांच्या याचिकेवर 15 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता सुनावणी घेतली. यावेळी केंद्राचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अजय तल्हार यांनी शपथपत्राद्वारे चूक मान्य केली. त्यात त्यांनी कबुल केले की, प्रथमेश याने आपली जन्मतारिख आणि लिंग आदीसह सर्व नोंदी योग्यरित्या नोंदवलेल्या आहेत. तथापि, प्रतिवादीच्या चुकीनेच त्याचा महिला खेळाडूंच्या यादीत समावेश झाला होता. मात्र तारिख उलटून गेल्यामुळे 19 वर्षांखालील पुरुषांच्या गटात नाव दुरुस्ती करण्यास वाव राहिलेला नाही म्हणून असमर्थता दर्शवण्यात आली.
प्रथमेशला न्याय मिळाला...
दोन्ही बाजू जाणून घेतल्यानंतर यावर निर्णय देतांना न्यायालयाने स्पष्ट केले की, यात याचिकाकर्त्याचा दोष नाही हे स्पष्टच आहे. तथापि, दोन संघटना आहेत याचिकाकर्त्याने आपली नोंदणी रद्दही केलेली नाही. त्यामुळे याचिकाकर्ता पुण्याची स्पर्धा खेळण्यास पात्र आहे. तर हा विषय बॅडमिंटन फेडोरेशन आणि बॅडमिंटन एशियाच्या धोरण आणि मार्गदर्शक तत्वाशी संबंधीत आहे. याचिकाकर्त्यास पुण्याच्या स्पर्धेत सहभागी होता आले नाही तरी त्यास नागपूरच्या स्पर्धेत सहभागी होता येईल, असे म्हणत खंडपीठाने याचिका निकाली काढली.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: वीरांची अग्निपरीक्षा! भरतीसाठी आलेल्या तरुणांना ना राहण्यासाठी जागा ना पिण्यासाठी पाणी
मोठी बातमी: नाशिकला पावसाचा जोर वाढताच जायकवाडी धरणातून मोठा विसर्ग; गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा