व्हिडिओ: जायकवाडी पक्षी अभयारण्यात पक्ष्यांचे थवे, डोळ्यांचे पारणे फेडणारे द्दश्य
Aurangabad Bird: पक्ष्याचे शेकडोंच्या संख्यने घरटी रामडोह, गळनिंब, वरखेड, बोरगाव या परिसरात केलेल्या निरीक्षणात आढळून आली.
Aurangabad Bird: औरंगाबादेतील पैठणच्या जायकवाडी पक्षी अभयारण्यात (Jayakwadi Bird Sanctuary) पक्षी आगमनास सुरुवात झाली असून, विविध प्रकारची बदके, सुरय, कुरव आणि करकोचे अशा पक्ष्यांचे थवेच्या थवे पाहायला मिळत आहे. पक्ष्याचे शेकडोंच्या संख्यने घरटी रामडोह, गळनिंब, वरखेड, बोरगाव या परिसरात केलेल्या निरीक्षणात आढळून आली. विशेष म्हणजे यावर्षी जायकवाडी पक्षी अभयारण्यात पक्ष्यांचे आगमन उशिरा झाले आहे.
देशांतर्गत स्थलांतर करणारे पक्षी साधारणतः आपल्याकडे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात यायला सुरुवात होते. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात विदेशी पक्ष्यांचे प्रमाण मोठ्याप्रमाणावर वाढते. मात्र यावर्षी सर्वत्र लांबलेला पावसाळा बदलत चाललेले ऋतुचक्र यामुळे, पक्ष्यांचे स्थलांतर उशिरा सुरू झाले. तर इथून पुढे थंडी जशी वाढेल तसे पक्षी येताना दिसतील. सद्या जायकवाडी पक्षी अभयारण्यात पक्ष्यांचे आगमन सुरु झाले असून, डोळ्यांचे पारणे फेडणारे द्दश्य पाहायला मिळत आहे. तर पक्षीप्रेमी देखील गर्दी करतांना दिसत आहे.
एन्व्हार्यमेंटल रिसर्च फाउंडेशन अँड अकॅडमीतर्फे पक्षी अभयारण्यात विविध ठिकाणी फिरून प्राथमिक पक्षी निरीक्षण केले जात आहे. त्यात असे आढळून आले आहे की, जायकवाडी धरणाचे नाथसागर जलाशय 90% भरलेले असल्याने, पक्ष्यांसाठी मोकळ्या जागा उपलब्ध झालेल्या नाहीत. तसेच जे पक्षी आलेले आहेत ते खोल पाण्यात किनाऱ्यावरून दिसतात.
'या' पक्षांचे आगमन...
यावेळी रामडोह, गळनिंब, वरखेड, बोरगाव या परिसरात नुकत्याच केलेल्या पक्षी निरीक्षणात संस्थेचे डॉ. दिलीप यार्दी आणि कुणाल विभांडीक, श्रवण परळीकर, कल्याणी देशपांडे, शरयू बिडवई यांना विविध बदके त्यात तरंग बदक, चक्रवाक, अडई, नकटा बदक, थापट्या बदक, तलवार बदक, हळदीकुंकू बदक, वारकरी बदक यांचा मोठा थवा खोल पाण्यात दिसून आला. त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी भारतीय पाणकावळा याचे घरटे आढळून आले. विविध बदके, तरंग बदक (red crested Pochard) चक्रवाक (Ruddy shelduck) अडई (Lesser Whistling Teal) नकटा बदक (Knob Billed Duck) थापट्या बदक (Northern Shoveller) तलवार बदक (Northern Pintail) हळदीकुंकू बदक (Spot Billed Duck) वारकरी बदक (Common Teal) यांचा मोठा थवा खोल पाण्यात दिसून आला. त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी भारतीय पाणकावळा (Indian Shag) याचे घरटे आढळून आले.
सोबतच शराटी (Ibis), उघड्या चोचीचे करकोचे (Open Billed Storks), पलासचा कुरव (Pallas Gull), तपकिरी डोक्याचा कुरव (Brown Headed Gull), नदी सुरय (River Terns), कैकर (Osprey), दलदली भोवत्या (western Marsh Harrier) , चिखल्या (Plovers), पाणलावे (Sandpipers) असे आणि इतर अनेक विविध पक्षी चांगल्या संख्येने दिसून आले, त्याचबरोबर हजारोंच्या संख्येने उडणाऱ्या भोरड्या मैना (Rosy Starling) यांचे विलोभनीय दृश्य (Murmuration) देखील सध्या जायकवाडी पक्षी अभयारण्यात बघायला मिळत आहे.
डोळ्यांचे पारणे फेडणारे द्दश्य, पाहा व्हिडिओ
एकदिवसीय पक्षी मोजणी प्रशिक्षण
एन्व्हार्यमेंटल रिसर्च फाउंडेशन अँड अकॅडमीतर्फे करण्यात आलेल्या निरीक्षणातील माहिती संस्थेने वन विभागाला देखील कळवली आहे. तर येत्या महिनाभरात जायकवाडी पक्षी अभयारण्यात भरपूर पक्षी दिसतील असा संस्थेचा अनुमान आहे. तसेच जानेवारी महिन्याच्या शेवटी पक्षी गणनेचा उपक्रम घेण्यात येणार आहे. त्यामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे अशा निसर्ग- पक्षीप्रेमींसाठी एकदिवसीय पक्षी मोजणी प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. त्यात आवर्जून नावे नोंदवावीत असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ दिलीप यार्दी यांनी केले आहे.