AU नावाला काउंटर करण्यासाठी ES पुढे करण्यात आलं; संजय राऊतांच्या आरोपाला शिरसाटांचे उत्तर
Maharashtra Politics: संजय राऊत यांच्या आव्हानाला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उत्तर दिले आहे.
Sanjay Shirsat On Sanjay Raut: ठाण्यातील बिल्डर सुरज परमार (Suraj Parmar) यांच्या आत्महत्येचा मुद्दा पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या मुद्यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरलं आहे. सुरज परमार यांची डायरी सापडली आहे. त्यात काही लोकांची नावे आहेत. हिंमत असेल तर याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी लावा असे आव्हान संजय राऊत यांनी सरकारले दिले आहे. तर संजय राऊत यांच्या याच आव्हानाला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उत्तर दिले आहे. AU नावाला काउंटर करण्यासाठी ES पुढे करण्यात येत असल्याचं शिरसाट म्हणाले आहे.
औरंगाबाद (Aurangabad) येथील विमानतळावर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना शिरसाट म्हणाले की, खासदार विनायक राऊत आणि संजय राऊत यांना रोज एक बोलण्यासाठी विषय हवा आहे. यांना आता पक्षाचं काहीही राहिलेलं नाही. पक्ष आता बुडत चाललं असल्याची त्यांना चिंता नाही. यांना फक्त आरोप करण्यात मजा वाटत आहे. गेली अडीच वर्षे ते सत्तेत होते. या अडीच वर्षांच्या काळात त्यांनी ES कोण, DS कोण किंवा आणखी कोण याबद्दल त्यांनीच चौकशी करायला पाहिजे होते. ज्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्रास देण्याचा प्रयत्न या लोकांनी केला होता, त्यावेळी या सर्व गोष्टी काढायला पाहिज्या होत्या. मुळात त्यांना माहित आहे की, या प्रकरणात काहीही तथ्य नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार काउंटर करण्याचा असल्याचं शिरसाट म्हणाले.
अपूर्ण माहितीवर आरोप केले जातायत...
पुढे बोलतांना संजय शिरसाट म्हणाले की, आमचं लक्ष फक्त विकास कामांवर असून, आम्ही फक्त त्याकडेच लक्ष देतोय. त्यामुळे यांच्याकडे आता कोणतेही विषय उरले नसल्याने ते अशाप्रकारे बोलतायत. आधी ते म्हणाले की, दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयने चौकशी केली आहे. मात्र आता अशाप्रकारे कोणतेही चौकशी केली नसल्याचं सीबीआयने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे यांनाच पूर्ण माहिती नाही. यांची माहितच अपूर्ण असल्यामुळे यांना असे विधान करावे लागत आहे. त्यामुळे काउंटर करण्यासाठी काहीतरी बोललं पाहिजे म्हणून असे आरोप केले जात असल्याचं देखील शिरसाट म्हणाले.
संजय राऊत शिवसेना संपवणार...
तर यावेळी संजय राऊत यांच्यावर टीका करतांना शिरसाट म्हणाले की, सद्याला शिवसेनेची अवस्था अशी आहे की, शिवसेना पक्ष हे आता उद्धव ठाकरे चालवत नाही. शिवसेना पक्ष राष्ट्रवादी चालवत असून, संजय राऊत त्यांचे प्रवक्ते आहेत. त्यामुळे शिवसेना कशी संपेल याची पद्धतशीर मांडणी संजय राऊत यांना करता येते आणि ते करत असल्याचा खोचक टोला शिरसाट यांनी यावेळी लगावला. तसेच ज्या दिवशी शिवसेना संपेल त्या दिवशी संजय राऊत शरद पवार यांच्या मांडीवर बसलेले दिसतील असेही शिरसाट म्हणाले.