Aurangabad: आणखी दहा टक्के पाणीसाठा वाढल्यास जायकवाडीतून केला जाऊ शकतो विसर्ग; कारण...
jayakwadi: 1 हजार 522 फुट जल क्षमता असलेल्या जायकवाडी धरणात आता 1 हजार 515 फुट एवढा पाणीसाठा झाला आहे.
Aurangabad News: नाशिक जिल्ह्यातील पाऊस थांबला असला तरीही वरील धरणातून विसर्ग सुरूच असल्याने जायकवाडी धरणाची पाणीपातळी मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. 1 हजार 522 फुट जल क्षमता असलेल्या जायकवाडी धरणात आता 1 हजार 515 फुट एवढा पाणीसाठा झाला आहे. त्यात धरणातील पाणीसाठा 69 टक्क्यांवर गेला आहे. तर धरणाच्या मंजूर करण्यात आलेल्या प्रचलन आराखड्यानुसार सद्या 31 जुलैपर्यंत धरणात 79 टक्के पाणीसाठा ठेवता येणार नाही. त्यामुळे आणखी दहा टक्के पाणीसाठा वाढल्यास जायकवाडीतून पाण्याच्या गोदावरीत विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे.
प्रचलन आराखडा म्हणजे काय?
प्रत्येक धरणाच्या पाणीसाठ्याचा एका आराखडा ठरलेला असतो. त्यानुसार सद्या उपलब्ध असेलला पाणीसाठा आणि होणारी आवक लक्षात घेऊन, दर पंधरा दिवसासाठी धरणात किती पाणीसाठा शिल्लक ठेवता येईल याची आकडेवारी ठरवली जाते. त्यामुळे 31 जुलैपर्यंत सद्या धरणात 79 टक्के पाणीसाठा ठेवता येणार आहे. त्यांनतर 1 ऑगस्टला हा आकडा बदलेल. पण त्यापूर्वी जर धरण 79 टक्के भरला तर पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे.
35 गावांना सतर्कतेचा इशारा...
नाशिक जिल्ह्यातील धरणातून गोदावरीत विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे वैजापूर आणि गंगापूर जिल्ह्यातील नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यातच खुद्द जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी वैजापूर येथील शिंदे वस्तीला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. तसेच जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यास गोदावरी काठच्या गावांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून आढावा घेतला जात आहे.
धरणाची आत्ताची परिस्थिती...
पाण्याची आवक 41 हजार 357
जिवंत पाणीसाठा 1500.324
धरणाची टक्केवारी 69.11
मागील वर्षी याच दिवशी 35.38
सलग चौथ्या वर्षी धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता
जायकवाडी धरणाची पाण्याची आवक आणि उपलब्ध पाणीसाठा पाहता यावेळी सुद्धा धरण शंभर टक्के भरेल असा अंदाज वर्तवला जात आहे. जुलै महिना संपण्यापूर्वीच जायकवाडी धरण 69 टक्के भरले आहे. अजून पावसाळ्याचे दोन महिने शिल्लक आहे. धरण भरण्यासाठी 31 टक्के पाणीसाठा हवा आहे. विशेष म्हणजे गेल्या 13 दिवसात धरण 35 टक्क्यांनी भरला आहे. त्यामुळे आणखी जोरदार पाऊस झाल्यावर धरण शंभर टक्के भरण्याची अंदाज आहे.