Aurangabad Rain: औरंगाबाद जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी, पहा कोणत्या भागात काय परिस्थिती
Aurangabad Rain: पहाटेपासून ढगाळ वातावर असल्याने आज सूर्यदर्शन झाले नसल्याची परिस्थिती आहे.
Aurangabad Rain News: गेल्या तीन दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) विविध भागात पावसाने (Rain) हजेरी लावत, घराबाहेर निघणं अवघड करून सोडले आहे. त्यातच आज पुन्हा चौथ्या दिवशी सकाळपासून अनेक भागात पाऊस कोसळत असल्याने शेतकरी हैराण झाले आहे. पहाटेपासून ढगाळ वातावर असल्याने आज सूर्यदर्शन झाले नसल्याची परिस्थिती आहे. त्यातच काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच-पाणी असल्याचे चित्र आहे.
आज पहाटेपासून वैजापूरमध्ये पावसाची तुफान बॅटिंग पाहायला मिळाली. तर गंगापूर तालुक्यात सकाळपासुन ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस सुरु असल्याचे चित्र आहे. तर वाळूज भागात देखील पहाटेपासून पावसाला सुरवात झाली असल्याने पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच शेंदुरवादा व सावखेडा परिसरातही सकाळपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. औरंगाबाद तालुक्यातील पिंप्रीराजा चितेपिंपळगांव परीसरात रिमझिम पावसाची हजेरी पाहायला मिळाली. तर कन्नड तालुक्यातील चापानेर परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरणात आणि रिमझिम पाऊस पडत होता. मात्र 10 वाजता मुसळधार पाऊस सुरु झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळाले.
लासूर स्टेशन भागात पाणीच-पाणी...
कालपासून होत असलेल्या पावसामुळे गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन भागात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने शेतात अनेक ठिकाणी अजूनही पाणी तुंबलेले आहे. लासुर स्टेशनसह शिल्लेगाव, शंकरपुर, सिरेसायगावसह अनेक गावांमध्ये परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. तर अनेक गावांत मुसळधार पावसामुळे मका, कापुस, बाजरी, सोयाबीनसह अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान शिऊर येथील सुनील बोडखे यांचे घर पावसामुळे ढासळल्याची घटना आज सकाळी घडली आहे. या घरात राहणारे भाडेकरू रंजित पगारे व त्यांचा परिवार सुदैवाने बचावले आहे.
मदतीचा घोषणा वाहून गेली....
एकीकडे पावसाने शेतकरी पूर्णपणे खचला असताना दुसरीकडे सरकारची मदतीची घोषणा पुराच्या पाण्यात वाहून गेली की, काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कारण प्रचंड नुकसान होत असताना कोणतेही प्रशासकीय कर्मचारी-अधिकारी पंचनामे करण्यासाठी बांधावर फिरकत नसल्याचे चित्र आहे. त्यातच दिवाळी तोंडावर असताना देखील अजूनही नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नसल्याचा आरोप शेतकरी करतायत.
संबंधित बातमी...