ईडीला घाबरुन कुणीही आमच्याकडे, भाजपकडे येऊ नये; एकनाथ शिंदे थेटच बोलले
Aurangabad: ईडीच्या कारवाईच्या भीतीने अनेकजण पक्ष बदलत असल्याचा आरोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.
Aurangabad: शिवसनेचे नेते संजय राऊत यांच्यावर सकाळपासून ईडीची कारवाई सुरु आहे. यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया येत असतांना, ईडीच्या कारवाईच्या भीतीने अनेकजण पक्ष बदलत असल्याचा आरोपही केला जात आहे. याच प्रश्नाला उत्तर देतांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेटपणे उत्तर दिले आहे. ईडीला घाबरुन कुणीही आमच्याकडे, भाजपकडे येऊ नये असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहे. औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषेदत बोलतांना त्यांनी असे म्हंटले आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे...
ईडीच्या कारवाईबाबत बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणानी यापूर्वी देखील काही कारवाया केल्या आहेत. जर त्यांनी सुडाने हे काम केलं असते किंवा चुकीच्या पद्धतीने काम केले असते तर, न्यायालयाने लगेच त्यांना दिलासा दिला असता. त्यामुळे यापूर्वी ज्या कारवाया झाल्या आहेत, त्या सुद्धा तपासून घ्यावे. तसेच सुडाच्या कारवाईची गरज काय? आम्ही एवढं मोठ सरकार बनवले त्यात एकतरी सुडाच्या भावनांनी कारवाई केली का? असा प्रश्न मुख्यमंत्री एकन शिंदे यांनी उपस्थित केला. आमच्याकडे आलेल्या आमदार किंवा खासदार पैकी एकानेही आम्हाला ईडीची नोटीस पाठवण्यात आल्याच सांगितले नाही.
तर मी जाहीरपणे सांगत आहे की, ईडीच्या कारवाईच्या भीतीपोटी कुणीही आमच्याकडे येत असेल तर त्यांनी आमच्याकडे येऊ नयेत. शिवसेनेकडेही येऊ नका आणि भाजपकडे सुद्धा येऊ नका असा शिंदे म्हणाले. आम्हाला दबाव टाकून कुणालाही पक्षात घ्यायचं नाही. अर्जुन खोतकर असू द्या की आणखी कुणीही असू द्या ईडीच्या कारवाईच्या भीतीपोटी आमच्या पक्षात येण्याचे पुंण्याचे काम कुणीही करू नयेत असे शिंदे म्हणाले.
खोतकरांना टोला...
शिंदे गटात सहभागी होण्यापूर्वी अर्जुन खोतकर यांनी आपण अडचणीत असून, स्वतःला सेफ ठेवण्यासाठी निर्णय घेतला असल्याचे विधान केले होते. तसेच माझ्या अडचणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगून मी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे खोतकर म्हणाले होते. त्यामुळे ईडीच्या कचाट्यात सापडल्यानेच खोतकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा होती. यावरूनच मुख्यमंत्री यांनी, ईडीला घाबरून कुणीही आमच्याकडे येऊ नका, असा टोला खोतकरांना लावला असल्याचे बोलले जात आहे.