(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: समृद्धी महामार्गावर कारला भीषण आग, पुण्यातील कुटुंब थोडक्यात बचावलं
Samruddhi Highway Car Fire : सुदैवाने यात कार चालक आणि प्रवासी सुरक्षित असून कोणतेही जीवितहानी झालेली नाही.
Samruddhi Highway Car Fire News: औरंगाबादमध्ये (Aurangabad) समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) एका चारचाकी कारला भीषण आग (Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. मात्र सुदैवाने यात कार चालक आणि प्रवासी सुरक्षित असून कोणतेही जीवितहानी झालेली नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 11 डिसेंबरला समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Highway) नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र उद्घाटनानंतर अपघाताच्या मालिका सुरु असल्याने समृद्धी महामार्ग चर्चेत आला आहे. अशातच आता औरंगाबादच्या वैजापूर जवळील गलांडे वस्तीजवळील एका धावत्या कारने पेट घेतला आहे. आगीचे प्रमाण एवढे होते की, कार काही क्षणात जळून खाक झाली आहे. तर आग लागलेली कार पुणे येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, नितीन सिंह राजपूत यांची गाडी असल्याचे देखील समोर आलंय.
कुटुंब थोडक्यात बचावलं...
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजपूत कुटुंब समृद्धी महामार्गावरून शिर्डी मार्गे पुण्याला जात होते. दरम्यान वैजापूरच्या गलांडे वस्तीजवळ कार येताच गाडीतून धूर निघत असल्याचे नितीन सिंह राजपूत यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी गाडीचा वेग कमी करून कार रस्त्याच्या कडेला उभी केली. कारमधून खाली उतरून पाहणी केली असता, समोरील भागात आग लागल्याचे त्यांना पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांनी तात्काळ गाडीत बसलेल्या कुटुंबातील सदस्यांना बाहेर काढले. पण अवघ्या काही मिनिटात आगीचा भडका उडाला आणि काही क्षणात कार जळून खाक झाली. त्यामुळे नितीन सिंह राजपूत यांनी गाडी थांबवल्याने मोठा अनर्थ टळला आणि राजपूत कुटुंब थोडक्यात बचावलं.
व्हिडिओ व्हायरल...
औरंगाबादच्या वैजापूर जवळील गलांडे वस्तीजवळ एका धावत्या कारला आग लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक पांढऱ्या कलरची कारला भीषण आग लागली असल्याचे पाहायला मिळत आहे. कार कोणती होती याबाबत माहिती मिळू शकली नाही. पण आग एवढी भीषण होती की,काही क्षणात कार अक्षरशः जळून खाक झाली आहे. त्यामुळे गाडीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. पण वेळीच प्रवासी गाडीच्या बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असून, औरंगाबाद ग्रामीण पोलिसात याची नोंद करण्यात येत आहे.
काल समृद्धीवर अपघात, आज पुलाखाली ट्रक अडकला; वाहनचालकाची झाली अशी कसरत