Abdul Sattar Vs BJP: अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडमध्ये भाजपकडून 'शहर बंद'ची हाक
Abdul Sattar Vs BJP: पुन्हा एकदा भाजपने आंदोलनाचे शस्त्र उचलत सोमवारी (13 फेब्रुवारीला) सिल्लोड बंदची हाक दिली आहे.
Abdul Sattar Vs BJP: राज्यात शिंदे गट आणि भाजप (BJP) सोबत सत्तेत असताना, दुसरीकडे औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये मात्र शिंदे गट विरोधात भाजप असा वाद कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या ताब्यात असलेल्या सिल्लोड नगरपरिषदेच्या विरोधात रस्त्यावर उतरत भाजपने आंदोलन केले होते. आता पुन्हा एकदा भाजपने आंदोलनाचे शस्त्र उचलत उद्या 13 फेब्रुवारीला सिल्लोड बंदची हाक दिली आहे. त्यामुळे सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याबाबत भाजपकडून काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सिल्लोड नगर परिषदेने प्रस्तावित केलेल्या करवाढी विरोधात भाजपतर्फे 26 जानेवारी 2023 उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. प्रस्तावित कर वाढ ही चुकीच्या पद्धतीने लावलेली असून ती पूर्णपणे बेकायदेशीर असल्यामुळे रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात 6 फेब्रुवारीरोजी भाजपतर्फे ढोल बजाव आंदोलन देखील करण्यात आले होते. आंदोलनानंतर देखील नगर परिषद प्रशासनाला जाग आली नाही. त्यामुळे येत्या 13 फेब्रुवारी सोमवार रोजी भाजपतर्फे सिल्लोड बंदची हाक देण्यात आल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.
करवाढीसाठी शहराचे चार झोन करण्यात आले असून, सर्वाधिक कर झोन क्रमांक एक मधील मालमत्तांना लावण्यात आल्याने सामान्य जनतेला वेठीस धरून मालमत्ता करवाढ करण्याचे षडयंत्र आहे. एकदा करवाढ केल्यानंतर पुढील काळात यापेक्षा अधिक कर भरावा लागणार आहे हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे. शासन निर्णयानुसार व योग्य पध्दतीने आकारण्यात आलेला कर भरण्यास विरोध नाही. परंतु चुकीचा मालमत्ता कर आकारणी करून कराच्या माध्यमातून जमा करण्यात येत असलेल्या खंडणीचा विरोध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिल्लोड बंदचे आवाहन करण्यात आल्याचं भाजपकडून सांगण्यात आले आहे.
सत्तार विरुद्ध भाजप...
राज्यात सत्तेत सोबत असले तरीही सिल्लोडमध्ये भाजप विरुद्ध अब्दुल सत्तार हा वाद काही संपलेला नाही. अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस सोडल्यावर ते भाजपमध्ये येणार होते. यासाठी संपूर्ण तयारी देखील करण्यात आली होती. मात्र सिल्लोडमधील भाजपच्या नेत्यांनी विरोध केल्याने अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेश होऊ शकला नव्हता. मात्र आता शिंदे गट आणि भाजप सत्तेत सोबत आहे. तरीही सिल्लोडमधील अब्दुल सत्तार आणि भाजप यांच्यातील एकमेकांना होणार विरोध कायम आहे.
बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन...
सिल्लोड नगरपरिषद घेत असलेले निर्णय शहरवासियांसाठी घातक असून, नगरपरीषदेच्या माध्यमातून शहरातील नागरीकांचा छळ करण्यात येत आहे. सिल्लोड शहर छळ छावणी झाली आहे. आजच या घातक निर्णयांना विरोध केला नाही, तर कष्टाने कमावलेल्या मालमत्ता हिसकाउन घेण्यात येतील. शहराला मालमत्ता कराच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टी सिल्लोड शहराच्या वतीने 13फेब्रुवारी 2023 रोजी सिल्लोड बंद करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. बंदमध्ये सहभागी होऊन मालमत्ता कराचा विरोध करा, आपल्या मालमत्तांचे, कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करा. असे आवाहन भाजपतर्फे करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या: