Aurangabad: शेतकऱ्यांनी लगेच पेरणी करू नयेत; कृषी अधिकाऱ्यांनी केलं आवाहन
शनिवारी मराठवाड्यातील अनेक भागात दमदार पाऊस झाला.
Agriculture Department On Rain: औरंगाबादसह मराठवाड्यातील अनेक भागात गेल्या दोन दिवसात चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी लगेच पेरणीच्या कामाला लागतात. मात्र पुढे पाऊस लांबणीवर गेल्यास दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते. त्यामुळे 75 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नयेत असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.
औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातील खरीप पूर्व आढावा बैठक कृषी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. औरंगाबादेतील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प कार्यालयात ही बैठक झाली. यावेळी राज्याच्या तुलनेत मराठवाड्यात सोयाबीन आणि कापूस उत्पदान क्षमता खूप कमी आहे. त्यामुळे या पिकाची उत्पादकता वाढावी यासाठी राज्यसरकारने हजार कोटींचा निधी उपलब्ध केला असल्याची माहिती, धीरज कुमार यांनी दिली. सोबतच जोपर्यंत 75 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नयेत असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी घाई करू नयेत...
मृग नक्षत्राच्या सरी मराठवाड्यातील काही जिल्ह्यात कोसळल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर काही ठिकाणी पेरणीला सुद्धा सुरवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगेच पेरणीची घाई करू नयेत असा सल्ला कृषी विभागाकडून केले जात आहे. तर पेरणी केल्यानंतर पुढे पाऊस लांबणीवर गेल्यास दुबार पेरणी करण्याचं संकट येऊ शकते. त्यामुळे कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार पेरणी करणे उत्तम राहील.
वीज पडून 6 ठार
शनिवारी मराठवाड्यातील अनेक भागात दमदार पाऊस झाला. औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, बीड आणि हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र याचवेळी निसर्गाची अवकृपा सुद्धा पाहायला मिळाली. अंगावर वीज पडून जालना जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला तर, दोन जण जखमी झाले. औरंगाबाद जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला असून, नांदेड जिल्ह्यात एक जण जखमी झाला. तसेच अनेक ठिकाणी वीज पडून जनावरे सुद्धा दगावली असल्याच समोर आलं आहे.