(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: चक्क 'जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात' नशेडी लोकांचा अड्डा; सतरंज्या टाकून चालतात पार्ट्या
Aurangabad Crime News: गेल्या आठवड्यात औरंगाबादमध्ये पोलिसांनी तब्बल 600 बटन गोळ्या पकडल्यानं खळबळ उडाली होती.
Aurangabad Crime News: गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराला नशेची कीड लागली आहे. ज्याप्रमाणे कुठेही सहजपणे गुटखा उपलब्ध होतो, त्याचप्रमाणे शहरात कुठेही नशेसाठी लागणाऱ्या गोळ्या उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे. आता या नशेखोरांची एवढी हिम्मत वाढली आहे की, थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर असलेल्या एतेहासिक रंगीन दरवाज्यात पार्ट्या चालत आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शहरातील कोणत्या-कोणत्या भागात दररोज पोलिसांकडून गुंगीकारक औषधींचा साठा पकडण्यात येत आहे. वस्ती, गल्ली आणि मोहल्यात सहजपणे नशेसाठी लागणारी औषधी उपलब्ध होतायत. त्यामुळे तरुणाई मोठ्या प्रमाणावर नशेच्या आहारी जात आहे. अशात पोलिसांकडून एनडीपीएस पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पण अजूनही बटन गोळ्या विक्रीवर पोलिसांना पूर्णपणे नियत्रण मिळवता आले नाही.
जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात नशेडी लोकांचा अड्डा
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या बंगल्यासमोर असलेल्या एतेहासिक रंगीन दरवाज्यात रोज काही तरुण रात्रीच्या सुमारास सतरंज्या टाकून पार्ट्या करतात. विशेष म्हणजे ह्या पार्ट्या नशा करण्यासाठी चालतात. इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट टाकत या घटनेला वाचा फोडली आहे. तर जिल्हाधिकारी यांच्या बंगल्यासमोर असलेला ऐतिहासिक रंगीन दरवाजा नशेडी लोकांचा अड्डा झाला आहे. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात हे इतकं साचत असेल, तर बाकी शहरात कुठे कुठे असणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
'बटन'चा धुमाकूळ...
शहरातील तरुणाई बटन गोळ्याच्या आहारी गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात औरंगाबादमध्ये पोलिसांनी तब्बल 600 बटन गोळ्या पकडल्यानं खळबळ उडाली होती. त्यानंतर सुद्धा रोज कुठे ना कुठे कारवाई सुरूच आहे. एवढच नाही तर तीन दिवसांपूर्वी एमआयएमच्या आंदोलनात अशेच काही तरुण बटन गोळ्याच्या नशा करून आंदोलनात घुसले असल्याचा आरोप खासदार जलील यांनी केला होता. यावेळी परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पोलिसांनी नियंत्रण मिळवले. त्यात आता थेट जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या समोर अशा पार्ट्या सुरु असतील तर पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल न बोलले बर, असं म्हणण्याची वेळ आली आहे.