Aurangabad: आईला बाहेर पाठवून पित्याकडून लेकीवर अत्याचार, नात्याला काळीमा फासणारी घटना
Aurangabad Crime News: वडिलांच्या मारहाणीला घाबरून मुलीची कुणाला सांगायला हिम्मत झाली नाही.
Aurangabad Crime News: औरंगाबादच्या शिवाजीनगर परिसरात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका पित्यानेच आपल्या 16 वर्षीय सावत्र लेकीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे वडिलांनी धमकी दिल्याने घाबरुन गेल्याने पिडीत मुलगी गेल्या वर्षभरापासून अत्याचार सहन करत होती. मात्र अखेर पिडीत मुलीच्या आईने पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रकार सांगितल्याने या घटनेला वाचा फुटली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, नराधम बापाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजीनगर परिसरात उत्तरप्रदेशच्या लखनऊ येथील एका परप्रांतीय कुटुंब किरायाच्या घरात राहत होते. दरम्यान 16 वर्षीय अल्पवयीन पिडीता आई-वडिलासह चार भावंडासोबत राहत होती. तर सावत्र वडील गिरणी चालवण्याचे काम करतात. वडील दुपारी जेवण्यासाठी घरी आले की आई गिरणीवर जात असे. याच संधीचा फायदा घेत नराधम सावत्र वडील आपल्या मुलीवर अत्यचार करायचा. तब्बल गेली एक वर्षे हा किळसवाना अत्याचार पिडीत मुलगी सहन करत होती.
अन् मुलीला धक्काच बसला...
या नराधम बापाकडून मुलीवर 2021 मध्ये पहिल्यांदा अत्याचार करण्यात आला. एक दिवस जेवण्यासाठी घरी आलेल्या नराधम बापाने मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. तसेच याबाबत कुणाला सांगू नयेत म्हणून, जबर मारहाण सुद्धा केली. या घटनेने मुलीला धक्काच बसला. मात्र या पहिल्या घटनेनंतर नराधमाचे कृत्य नेहमीचेच झाले होते. पण वडिलांच्या मारहाणीला घाबरून मुलीची कुणाला सांगायचा हिम्मत झाली नाही. त्यामुळे निमूटपणे तिने वर्षभर अत्याचार सहन केला.
अखेर आईची पोलिसात धाव...
वडिलांकडून होणारा अत्याचार सहन होत नसल्याने अखेर फेब्रुवारी 2022 मध्ये मुलीने आईला सर्व हकीकत सांगितली. त्यांनतर आपण पोलिसात जाऊ असा धीर आईने मुलीला दिला. मात्र नराधम बाप हा आई आणि मुलीला घराबाहेर जाऊ देत नव्हता. तसेच मारहाण करून त्यांना धमकी देत असल्याने पोलीसांकडे जाण्याबाबत आई-मुलीची हिम्मत होत नव्हती. मात्र अखेर हिम्मत करत आईने मुलीसह पुंडलिकनगर पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला प्रकार सांगितला. त्यांनतर पोलिसांनी तत्काळ आरोपीला बेड्या ठोकत ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.