Aurangabad: नशेच्या गोळयांची विक्री करण्याऱ्या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस बनले डॉक्टर; वेशांतर करुन सापळा रचला
Aurangabad Crime News: पोलिसांनी यावेळी डॉक्टरच्या वेशांतर करत नशेच्या गोळयांची विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या नशेच्या गोळयांची विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून मोठ्याप्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यासाठी NDPS सेलची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान अशाच एका कारवाईत आरोपींना बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांकडून वेशांतर करुन सापळा रचण्यात आला. पोलिसांनी यावेळी डॉक्टरच्या वेशांतर करत नशेच्या गोळयांची विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील घाटी परिसरात गुंगीकारक व नशेसाठी गैरवापर होवु शकणाऱ्या गोळ्या बेकायदेशीररित्या विक्रीसाठी दोन इसम घेऊन येत असल्याची माहिती NDPS सेलच्या पथकाला मिळाली होती. त्यामुळे आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. यासाठी घाटी परिसरात पोलिसांनी पथकही तैनात केले.
पोलिसांकडून वेशांतर...
आरोपींना ओळख पटू नयेत म्हणून पोलिसांनी डॉक्टरांच वेशांतर केलं. त्यानंतर रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार त्याच्या साथीदारासह मोटारसायकलवर येत असतांना वेशांतर केलेल्या कर्मचाऱ्यांना ते दिसले. त्यामुळे NDPS सेलच्या डॉक्टर बनलेल्या अंमलदारांनी बाकी टिमला इशारा केला. त्यामुळे सापळा लावून बसलेल्या पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. यावेळी त्यांची चौकशी केली असता, शेख नय्यर शेख नईम (रा. आसिफा कॉलनी, टाऊन हॉल, औरंगाबाद) आणि शेख रहिम शेख महेबुब (रा. आसिफा कॉलनी, टाऊन हॉल, औरंगाबाद) असे त्यांचे नाव असल्याचे समोर आले.
पोलिसात गुन्हा दाखल...
दोन्ही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची झडती घेतली असता एकुण 76 नशेच्या गोळया, मोबाईल, रोख रक्कम, मोटार सायकल असा एकुण 1 लाख 3 हजार 452 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर याप्रकरणी पोलीस ठाणे बेगमपुरा येथे गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (NDPS Act) अधिनियम 1985 व औषधी व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aurangabad: मुलींच्या मदतीला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला गुंडांकडून मारहाण; गुन्हा मात्र....
अडीच लाखांचा गुटखा जप्त...
दुसऱ्या एका गुन्ह्यात क्रांतीचौक पोलिसांनी अडीच लाखांचा गुटखा पकडला आहे. जुना मोंढा येथील सौदागर ट्रेडींग किराणा अॅन्ड जनरल स्टोअर्स, जुना मोढा मोती कारंजा रोड, औरंगाबाद येथे गुटख्याची साठवणूक करून ठेवण्यात आली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे क्रांतीचौक पोलिसांच्या विशेष पथकाने संबधित दुकानात जाऊन पाहणी केली. यावेळी दुकानामध्ये एकुण 2 लाख 52 हजार 486 रुपये किमतीचा गुटखा, तंबाखु, सुगंधीत सुपारी असा महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला मुद्देमाल मिळुन आला आहे. त्यामुळे दुकान चालक सय्यद अमजद सय्यद युसुफ (वय 46 वर्ष वर्ष रा. दलालवाडी औरंगाबाद) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.