Aurangabad: हंगामाच्या तोंडावर जनावर टोळी सक्रिय; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
Aurangabad Crime News: एकीकडे पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतेत असताना आता जनावर चोरीच्या घटना घडत असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.
Aurangabad Crime News: खरीप हंगामाला सुरवात झाली असून, बळीराजा पेरिणीच्या तयारीला लागला आहे. अशातच आता जनावर टोळी सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सोयगाव तालुक्यातील हनुमंतखेडा शिवारातून शेतात दावणीला बांधलेले तीन बैल आणि दोन गोऱ्हे अशा पाच जनावरांची चोरी झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात अज्ञाता व्यक्तीविरुद्ध चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, हनुमंतखेडा शिवारात विजय शामराव निकम यांची गट क्रमांक 138 मधील शेतात तीन बैल आणि दोन गोऱ्हे (लहान बैल) दावणीला बांधलेली होती. शनिवारी रात्री अज्ञातांनी या पाचही जनावरांची दावण सोडून चोरी केल्याचा प्रकार विजय निकम यांच्या लक्षात आले. यावरून विजय निकम यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाता विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन खरीप हंगामात या शेतकऱ्याचे बैल चोरी गेल्याने शेतकऱ्याची पंचायत झाली आहे.
मोठं आर्थिक नुकसान...
जनावरे चोरीच्या घटनेने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकरी विजय निकम यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, तीन वर्षांचे तीन बैल ज्यांची 60 हजार रुपये किमंत असून, तसेच 20 हजार आणि 18 हजार रुपये किमंत असलेल एकूण पाच बैल चोरीला गेले आहेत.
परिसरात भीतीचे वातावरण..
जनावर चोरी करणारी टोळी सक्रीय असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, रात्र शेतात जागून काढण्याची वेळ बळीराजावर आली आहे. तर सोयगावप्रमाणेच आणखी एका चोरीच्या घटनेत पिंप्रीअंतुर येथील सुनील लाडके यांच्या गट क्र 79 मधून एक गाय चोरी झाली आहे. या गायीची अंदाजे किंमत चाळीस हजार आहे. त्यामुळे सोयगाव तालुक्यात एकाच रात्री तब्बल सहा जनावरांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.