Aurangabad Crime : चक्क घरातील बेडरुममध्येच तयार केला बनावट विदेशी मद्याचा कारखाना; ‘उत्पादन शुल्क'ची कारवाई
Aurangabad Crime News: औरंगाबादच्या सिल्लोड शहरातील दुर्गानगर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत बनावट मद्य तयार करणारा हा घरगुती कारखाना उद्ध्वस्त केला आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबादमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) केलेल्या एका कारवाईत धक्कादायक माहिती समोर आली आहे. चक्क घरातील बेडरुममध्येच (Bedroom) बनावट विदेशी मद्य (Fake Foreign Liquor) तयार करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. या कारवाईत बनावट विदेशी मद्य तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्पिरिट, रंग द्रव्य, सुगंधी द्रवासह सीलबंद बाटल्या मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत. औरंगाबादच्या सिल्लोड शहरातील दुर्गानगर इथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत बनावट मद्य तयार करणारा हा घरगुती कारखाना उद्ध्वस्त केला आहे. तर या कारवाईत एकूण 2 लाख 76 हजार 415 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली आहे. दीपक ठकूबा गुंजाळ (रा. दुर्गानगर, सिल्लोड) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.
सिल्लोड शहरातील दुर्गानगर येथे बनावट विदेशी मद्य तयार करण्यात येत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यामुळे मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने या ठिकाणी छापा मारला. यावेळी पथकाला छाप्यात विदेशी मद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या 180 मि.ली. क्षमतेच्या 474 सीलबंद दारुच्या बाटल्या, 10 कॅनमध्ये 170 लिटर स्पिरिट, एका बाटलीमध्ये 750 मिलि अर्क रंग, तीन बाटल्यांमध्ये 3 लिटर सुगंधित, इसेन्स द्रव आणि सोबतच तीन पोत्यात बाटल्यांवर लावण्यात येणारे 2 बूच मिळाले. तसेच याच ठिकाणी बाटल्या साठवण्यासाठीची 20 खोकी, 12 पोत्यात 1900 रिकाम्या बाटल्या सापडल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत 2 लाख 76 हजार 415 रुपये असल्याची माहिती पथकाने दिली आहे. तर कारवाईनंतर आरोपीच्या विरोधात उत्पादन शुल्क विभागात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बेडरुममध्येच कारखाना?
उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार आरोपी दीपक गुंजाळ हा गेल्या अनेक दिवसांपासून बनावट विदेशी मद्य तयार करण्याचा काम करत असल्याचे तपासात समोर आले आहे. यासाठी त्याने आपल्याच घरातच कारखाना सुरु केला होता. घरातील बेडरुममधील पलंगाच्या ड्रॉवरमध्ये बनावट विदेशी मद्य तयार करण्यासाठीचे साहित्य लपवून ठेवले होते. तसेच स्पिरीटचे कॅनही त्याने याच ठिकाणी ठेवल्याचे कारवाईवेळी दिसून आले.
यांनी केली कारवाई!
ही कारवाई अधीक्षक संतोष झगडे, उपअधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक नारायण डहाके, दुय्यम निरीक्षक एस.एस. पाटील, स. डी. घुले, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आर. एम. भारती, एस. एस. गुंजाळे, जवान एम. एच. बहुरे, बी.सी. किरवले, एस.एस. खरात, आर. एल. बनकर, ए. एस. अन्नदाते यांच्या पथकाने केली.
इतर महत्वाच्या बातम्या: