Nana Patole: आम्ही तुमच्याकडे सत्ता मागायला आलो नव्हतो तर तुम्ही आला होता; पटोलेंचा शिवसेनेला टोला
Nana Patole On Shiv Sena: बसून निर्णय घेता आला असता, मात्र आम्हाला शिवसेनेने न कळवताच विरोधी पक्षनेता निवडला; नाना पटोले
Congress State President Nana Patole On Shiv Sena: राज्यात एकीकडे शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला असतांना, दुसरीकडे मात्र विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांची निवड झाल्याने यापूर्वीच काँग्रेसनं उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. तर आता यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेतेपदीच्या निवडीचा शिवसेनेने निर्णय घेण्यापूर्वी एकदा चर्चा करायला हवी, आम्ही तुमच्याकडे सत्ता मागायला आलो नव्हतो तर तुम्ही आला होता हे लक्षात ठेवा असा टोला पटोले यांनी लगावला आहे.
नाना पटोले आज औरंगाबाद दौऱ्यावर आले असतांना माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे गेले. विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता आम्हाला हवा होता. त्यामुळे यावर बसून निर्णय घेता आला असता, मात्र आम्हाला शिवसेनेने न कळवताच विरोधी पक्षनेता निवडला. मुळात आमची आघाडी विपरीत परिस्थीतीमध्ये झाली होती, आमची नैसर्गिक आगाडी नाही हे सत्य असल्याचं ते म्हणाले.
सत्ता मागायला आलो नव्हतो...
पण आम्ही आजही चर्चा करायला तयार आहोत, मात्र हे साधं बोलायला, विचारायला तयार नाही. तर आम्ही तुमच्याकडे सत्ता मागायला आलो नव्हतो, तुम्ही आमच्याकडे आले होते हे लक्षात ठेवा फक्त, असा टोला पटोले यांनी यावेळी शिवसेनेला लगावला. सोबतच आगामी निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रित लढवण्याबाबतचा निर्णय कार्यकर्ते घेतील, असेही पटोले म्हणाले.
शिंदे सरकारवरही टीका...
यावेळी बोलतांना नाना पटोले यांनी शिंदे सरकारवर सुद्धा हल्लाबोल केला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता मलाईदर खात्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. हे सरकार जास्त दिवस टिकणार नसून, हे ब्लॅकमेल सरकार आहे. तसेच गुजराती नेत्यांसाठी हे सरकार आहे. सर्व सत्तेचे वाटेकरी असून, हे सरकार जनतेचं सरकार नाही, अशी टीका पटोले यांनी केली.
मूठभर लोकांसाठी देश विकण्याचा प्रयत्न...
गेल्या आठ वर्षात देश विकून देश चालवणारी व्यवस्था भारतीय जनता पार्टीच्या रूपाने केंद्रात बसलेली आहे. देशाच्या संविधानीक व्यवस्थेला आणि लोकशाहीला संपवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक धोरण बदलून जीएसटी सारखा इंग्रजांसारखा कायदा आणून, या देशाच्या सर्वसामान्यांना लुटून मूठभर लोकांचा फायदा करून दिला जात आहे. त्यामुळे ही सर्व भूमिका जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी काँग्रेसनं आझादी गौरव यात्रा काढली असल्याचं नाना पटोले म्हणाले.