Aurangabad: आता बोला खैरे, औरंगजेबाच्या कबरीवर डोके टेकवणाऱ्यांची मते घेतली ना?: भाजप
राज्यसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपकडून चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
Aurangabad News: राज्यसभा निवडणुकीच्या निकालावरून आता स्थानिक राजकीय वातावरण सुद्धा तापताना पाहायला मिळत आहे.शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर भाजपचे औरंगाबाद शहर अध्यक्ष संजय केणेकर यांनी निशाणा साधला आहे. औरंगजेबाच्या कबरीवर डोके टेकवणाऱ्यांचे मते घेतली ना?, आता बोला खैरे असा टोला केणेकर यांनी लगावला आहे.
राज्यसभा निवडणुकीत भाजपने तिन्ही जागा जिंकल्यानंतर औरंगाबादमध्ये भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तर यावेळी केणेकर यांनी खैरेंवर जोरदार हल्ला चढवला. औरंगजेबाच्या कबरीवर ज्यांनी डोके ठेवले त्यांच्यासमोर गुडघे टेकून दोन मतांसाठी महाविकास आघाडीने लाचारी दाखवली. ही सुरवात असून, हे यश जनतेचे आहे. खैरे यांना एवढच सांगायचं आहे की, महाविकास आघाडीला जे दोन मत एमआयएमने दिले, त्यावरून यापुढे एमआयएम आणि आघाडीत युती होऊ शकते. त्यामुळे यानंतर खैरे यांच्या जागी शिवसेना आणि महाविकास आघाडीकडून जलील यांना उमेदवारी मिळू शकते. असा टोला केणेकर यांनी लगावला.
भाजपचा जल्लोष...
राज्यसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपकडून मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला आहे. औरंगाबादच्या उस्मानपुरा भागातील भाजप कार्यालयात सुद्धा असाच काही जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. ढोल-ताशे वाजवत भाजप नेत्यांनी ठेका धरल्याचे यावेळी पाहायला मिळाले. तर महिला कार्यकर्त्यांनी फुगडी खेळत आनंद साजरा केला. तसेच यावेळी मिठाईचे वाटप करत जल्लोष साजरा करण्यात आला.
मराठवाड्यात जल्लोष...
औरंगाबादप्रमाणे संपूर्ण मराठवाड्यात भाजपकडून विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला आहे. राज्यसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचा नांदेडमध्ये भाजपने जल्लोष साजरा केलाय. ढोल ताश्याच्या आवाजावर भाजप कार्यकर्त्यांनी भांगडा करत व नाचत,आनंदोत्सव साजरा केलाय. यावेळी पेढे वाटून व फटाक्याची मोठया प्रमाणात आतिषबाजी करण्यात आली. सोबतच जालना, बीड, उस्मानाबाद, हिंगोली उस्मानाबाद, परभणी आणि लातूरमध्ये सुद्धा भाजपने जल्लोष साजरा केलाय.