Aurangabad: औरंगाबाद-पैठण रस्त्याचे चौपदरीकरण होणारच; मात्र...
Aurangabad Paithan Road Update: बैठकीत 45 ऐवजी 30 मीटर जागेतच चौपदरीकरण करण्याचे निर्देश गडकरींनी दिले आहे.
Aurangabad-Paithan Road Update: गेल्या पंधरा वर्षांपासून औरंगाबाद-पैठण रस्याच्या चौपदरीकरणाचा मुद्दा प्रलंबित असताना गेल्या महिन्यात केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी भूमिपूजन करून चौपदरीकरणाचा नारळ फोडला होता. मात्र त्यांनतर गेल्या आठवड्यात चौपदरीकरण रद्द करून हा रस्ता दुपदरी करण्याचा निर्णय एनएचएआय यांनी घेतला होता. मात्र याबाबत मंगळवारी झालेल्या बैठकीत 45 ऐवजी 30 मीटर जागेतच चौपदरीकरण करण्याचे निर्देश गडकरी यांनी एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
काय म्हणाले गडकरी...
गडकरी यांनी मंगळवारी दिल्लीमध्ये पैठण रोडसंदर्भात बैठक घेतली. बैठकीस एनएचएआयच्या चेअरमन अलका उपाध्याय, मुख्य सरव्यवस्थापक आशिष असाटी यांची प्रमुख उपस्थिती होती. औरंगाबाद ते पैठण या रस्त्याचे आता 45 ऐवजी 30 मीटर जागेतच चौपदरीकरण करण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले. 30 मीटरमध्येच चौपदरीकरण करण्यात येणार असल्याने आता नव्याने भूसंपादन करण्याची गरज राहणार नाही. तसेच ज्या ठिकाणी रहदारी अधिक आहे, अशा ठिकाणी गरजेनुसार भूसंपादन करून रस्ता रुंद करा, अशा सूचनाही गडकरींनी दिल्या. दरम्यान, आधीच्या नियोजनामध्ये रुंदीकरणाबरोबरच गेवराई तांडा, बिडकीन आणि ढोरकीन या तीन गावांना बायपास प्रस्तावित केला होता. आता हे तीनही बायपास रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे आता पैठणकरांना दिलासा मिळाला आहे.
आतापर्यंत तीन वेळा भूमिपूजन...
औरंगाबाद-पैठण रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची मागणी गेल्या 15 वर्षांपासून सुरु आहे. प्रत्येक निवडणुकीत पैठण मतदारसंघात औरंगाबाद-पैठण रस्त्याचे चौपदरीकरणाचा मुद्दा आघाडीवर असतो. त्यामुळे 2012 मध्ये हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असताना या रस्त्याचे चौपदरीकरणासाठी भूमिपूजन करण्यात आले होते. त्यांनतर पुन्हा एकदा 2016 मध्ये नितीन गडकरी यांनी या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची घोषणा करत भूमिपूजन केलं. मात्र त्यानंतर सुद्धा पुढे काही हालचाली झाली नाहीत. त्यांनतर पुन्हा 24 एप्रिल 2022 रोजी गडकरी यांनी याच रस्त्याचे चौपदरीकरणासाठी भूमिपूजन केलं.
धनदांडग्यांना दणका!
औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाचा निर्णय झाल्यानंतर गेवराई तांड्यासह बिडकीन आणि ढोरकीन येथे बायपास करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे याठिकाणी ठिकाणी बिल्डर, उद्योजक, राजकारणी आणि राष्ट्रीय महामार्गाच्या काँट्रॅक्टर मंडळींच्या जमिनी घेऊन ठेवल्या होत्या. मात्र आता बायपास रद्द झाल्याने या धनदांडग्यांना दणका बसला आहे.