Aurangabad News: शिंदे-ठाकरे गटातील वाद आता प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातही; पाहा औरंगाबादेत काय घडलं
Aurangabad News: औरंगाबाद (Aurangabad) येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात देखील या दोन्ही गटातील नेत्यांमधील वाद पाहायला मिळाला आहे.
Chandrakant Khaire Vs Sandipan Bhumre: शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट निर्माण झाले आहे. या दोन्ही गटातील नेतेमंडळी एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाही. दरम्यान औरंगाबाद (Aurangabad) येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात देखील या दोन्ही गटातील नेत्यांमधील वाद पाहायला मिळाला आहे. शिंदे गटाचे नेते तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या शुभेच्छा न स्वीकारताच ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंनी (Chandrakant Khaire) कार्यक्रमस्थळावरून काढता पाय घेतला. तर घटनाबाह्य पालकमंत्री असल्याची टीका देखील खैरे यांनी केली. तर त्यांच्या टीकेला भुमरे यांनी सुद्धा उत्तर दिले आहे.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनाचा मुख्य ध्वजारोहण समारंभ पोलीस आयुक्त कार्यालयातील ‘देवगिरी' मैदानावर पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या हस्ते झाले. दरम्यान संपूर्ण कार्यक्रमानंतर प्रथेप्रमाणे पालकमंत्री भुमरे सर्व नेत्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले. मात्र भुमरे येत असतानाच ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी तेथून काढता पाय घेतला. तर याबाबत त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधी यांनी विचारणा केली असता, 'हे सरकार घटनाबाह्य असल्याच सांगत, केवळ ध्वजारोहणाचा मान आहे असे म्हणत काढता पाय घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे-ठाकरे गटातील वाद पाहायला मिळाला.
भुमरे यांचे उत्तर...
प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणानंतर भुमरे यांच्या शुभेच्छा न स्वीकारता, घटनाबाह्य सरकार म्हणून खैरे यांनी उल्लेख केला असल्याचं विचारल्यावर भुमरे यांनी देखील खैरेंना उत्तर दिले आहे. खैरे यांनी प्रजासत्ताक दिनाचा अपमान केला आहे. तर मला घटनाबाह्य पालकमंत्री सांगण्याचे अधिकार खैरे यांना कोणी दिली. आम्हाला घटनाबाह्य ठरवायला खैरे काही सुप्रीम कोर्ट आहेत का? असा सवाल भुमरे उपस्थित केला. तर खैरे काहीही बोलत असतात.सद्या जे काही चालले आहे, ते त्यांना सहन होत नसल्याने खैरे अशाप्रकारे वक्तव्य करतात. यापूर्वी देखील ध्वजारोहण होण्यापूर्वी ते निघून गेले होते. त्यामुळे त्यांना सवयच आहे, अशी टीकाही भुमरे यांनी यावेळी केली.
दानवेंकडूनही खैरेंची पाठराखण
दरम्यान चंद्रकांत खैरे यांच्या या भूमिकेची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील पाठराखण केली आहे. हे सरकार घटनाबाह्यच आहे. तर खैरे एका महत्त्वाच्या कामानिमित्त गेल्याचे सांगत दानवे यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
इतर महत्वाच्या बातम्या: