Chhatrapati Sambhaji Nagar : नामांतराच्या वादाचे पडसाद आता उद्योगक्षेत्रावर? शहरातील तणावावरून उद्योजकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Chhatrapati Sambhaji Nagar : शहरातील शांतता अबाधित ठेवण्याची मागणी उद्योजकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) नामांतराच्या निर्णयानंतर शहरातील तणावाची परिस्थिती पाहता आणि परस्परविरोधी वक्तव्ये व निवदेन प्रसारित करण्यात येत असल्याने शहरातील शांतता अबाधित ठेवण्याची मागणी उद्योजकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. याबाबत उद्योजकांनी मुख्यमंत्री यांना निवदेन देखील पाठवले आहे. त्यामुळे नामांतराच्या निर्णयाचे पडसाद आता उद्योगक्षेत्रावर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शहरातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्व विचारधारेच्या प्रमुखांना एकत्र बोलावून सामंजस्याने नामांतराचा विषय मार्गी लावत शांतता आणि सलोखा अबाधित राखावा, असे आवाहन करणारे पत्र शहरातील उद्योजकांच्या 'छत्रपती संभाजीनगर फर्स्ट' या संस्थेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. तसेच आता या सर्व परिस्थितीवर स्वतः मुख्यमंत्री यांनी पुढाकार घेण्याचे साकडे उद्योजकांनी घातले आहे.
काय म्हटले आहे पत्रात?
नुकतेच जी 20 परिषदेच्या दोन दिवसीय बैठकीचे आयोजन आमच्या शहराने, विशेषतः प्रशासनाने अतिशय उत्तमपणे पार पाडले. या आयोजनात सर्वच व्यावसायिक, व्यापारी आणि औद्योगिक संघटनांचा सक्रिय सहभाग होता. त्यानिमित्ताने शहराचे एक नवे रूप आपण जगाला दाखवू शकलो. जागतिक स्तरावर शहराचे नाव अधिक परिणामकारक पद्धतीने मांडता येण्या विषयी आमच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत आणि एकूणच शहरात उत्साही तसेच सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.
परंतु गेले काही दिवस शहर नामांतर आणि इतरही काही विषयावर शहर परिसरात अनेक परस्परविरोधी वक्तव्य आणि निवेदने प्रसारीत केली जात असून, ती सर्वसामान्य जनतेत अस्वस्थता निर्माण करू शकेल अशी आशंका वाटते. अशा परिस्थितीत शहरांमध्ये कोणत्याही प्रकारची सामाजिक अशांतता निर्माण होणे हे कोणालाच परवडणारे नाही. कोणत्याही अशांततेचा पहिला परिणाम दुर्दैवाने व्यापार, उद्योग, पर्यटन आणि पर्यायाने सामान्य माणसाच्या दैनंदिन रोजीरोटीवर होतो.
लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला सार्वजनिकरित्या आपले मत मांडण्याचा घटनादत्त अधिकार आहे. परंतु अशा अधिकाराचा वापर करीत असताना शांतपणे जीवन जगण्याच्या इतरांच्या अधिकारास बाधा येणार नाही हे पाहणे सर्व समाजधुरिणांचे प्राथमिक कर्तव्य आहे. तरी एक जबाबदार नागरी संघटना म्हणून आम्ही आपणास नम्र विनंती करतो की, या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेला विराम देण्यासाठी सर्व विचारधारेच्या प्रमुखांना एकत्र बोलावून सामंजस्याने संबंधित विषय मार्गी लावावा आणि शांतता तसेच सलोखा अबाधित राखाव, असे पत्रात म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
'आंदोलन मागे घेणार नाही'; गुन्हा दाखल झाल्यावर इम्तियाज जलील यांची पहिली प्रतिक्रिया