ती बुडाली.... प्रेमात आणि पैशांना! प्रेयसीच्या घरी चोरी करणारा 'सिकंदर'
लग्नाचा तगादा लावणार्या प्रेयसीला धडा शिकवायचं म्हणून सिकंदर अकबर खान या तरुणाने त्याच्या प्रेयसीच्याच घरी चोरी केली. हे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आता त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
औरंगाबाद : आपल्या प्रेयसीसाठी वाटेल ते करणारे प्रियकर तुम्ही पाहिले असतील पण प्रेयसीच्याच घरी चोरी करणारा प्रियकर कधीहा पाहिला नसेल. असाच काहीसा प्रकार औरंगाबादमध्ये घडला असून प्रियकरानेच प्रेयसीचे घर फोडल्याचा अजब प्रकार समोर आला. प्रेयसीच्या घरी प्रियकराने 57 हजारांवर डल्ला मारला आणि गाव गाठलं. आठ दिवसांनी या गुन्हाची उकल करण्यात पोलिसांना यश आलं असून प्रियकर आता तुरुंगाची हवा खातोय.
प्रेयसीच्या घरी चोरी करणाऱ्या या प्रियकराचं नाव आहे सिकंदर अकबर खान. रिक्षाचालक असलेला सिकंदरचं न्यू बज्यीपुरा भागात राहणाऱ्या एका तरुणीवर प्रेम जडलं. दोघांनीही प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. पण पुढे तरुणीने लग्नाचा तगादा लावला. लग्नाचा तगादा लावणार्या प्रेयसीला धडा शिकवायचं म्हणून या पठ्ठ्यानं प्रेयसीच्या घरातच चोरी केली.
महत्वाचं म्हणजे या सिंकदर अकबर खानचं लग्न आधीच झालेलं. त्यामुळे प्रेयसीने लग्नाचा तगादा लावल्याने ही आयडिया लढवली. प्रेयसी घरात नसताना तिच्या घरी चोरी केली आणि 57 हजार रुपये लंपास केले आणि थेट आपलं गाव गाठलं. ही चोरी कोणी केली हे त्या प्रेयसीला माहीत नव्हतं. त्यामुळे तिने औरंगाबाद पोलीस स्टेशनमध्ये या चोरीची तक्रार दाखल केली.
पोलिसांनी चोरीच्या तपास करताना तिच्या घरी कोण-कोण येत होतं याचा शोध घेतला. पोलिसांनी सिकंदर चौकशी केली असता त्यानेच ही चोरी केल्याचं स्पष्ट झालं. लग्नाचा तगादा लावत असल्याने प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी चोरी केल्याची कबुली त्याने दिली.
प्रेयसीसाठी आणाभाका खाणारे ,चंद्र तारे आणून देण्याचा शपथा खाणारे आपण पाहिले असतील. मात्र प्रेयसीच्या घरी चोरी करणारा हा कदाचित पहिलाच 'सिकंदर' असेल. त्यामुळे प्रेयसी प्रेमात तर बुडालीच पण पैशांनाही बुडाली असल्याची चर्चा या भागात सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या :
- काय सांगताय? 24 वर्षाच्या महिलेने दिला एकाच वर्षात 21 मुलांना जन्म, शंभरचा आकडा गाठण्याचा निर्धार
- बँकेत मास्क घालायची विनंती केल्याने 5.8 कोटी रुपयांच्या नोटा काढल्या अन् बँकवाल्यांना मोजायला लावल्या
- Viral News : महिलेच्या अंतर्वस्त्रामध्ये लपून पालीने केला तब्बल चार हजार मैलांचा प्रवास, इंग्लंडमधील विचित्र घटना