(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ellora Caves: वेरूळ लेण्यांसमोरचा जैन कीर्ती स्तंभ हटवा; पुरातत्व खात्याची मागणी
वेरूळ लेण्यामध्ये बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मांच्या लेण्यांचा समावेश असताना मुख्य प्रवेशद्वाराजवळ केवळ जैन कीर्ती स्तंभ का असा सवालही पुरातत्व खात्याने विचारला आहे.
औरंगाबाद: जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांच्या मुख्य मुख्य प्रवेशद्वाराबाहेर असलेला जैन कीर्ती स्तंभ हटवण्याची मागणी पुरातत्व विभागाने केली. हा स्तंभ पूर्णपणे अनाधिकृत असून जर, लेणीमध्ये बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मांच्या लेणी असतील तर एकाच धर्माचे प्रतीक असणारा स्तंभ का असा प्रश्न देखील पुरातत्त्व विभागानं विचारला आहे. यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
जगप्रसिद्ध वेरूळची लेणी आणि लेणी मुख्य प्रवेशद्वारावर भगवान महावीर यांच्या 2500 व्या निर्वाण महोत्सवानिमित्त, 48 वर्षांपूर्वी उभारलेला जैन कीर्ती स्तंभ आता येथून हलणार आहे. त्या ठिकाणी नवीन स्तंभाच्या जागेवर विश्व धरोहर एलोरा गुफाएं असे देवनागरी आणि इंग्रजीत वर्ल्ड हेरिटेज स्टोन लिहिलेला नामफलक बसवला जाईल.
तीन धर्मांच्या लेण्यांमध्ये एकाच धर्माचे प्रतिक का? असा सवाल विचारला जात असून यामुळे ट्रॅफिकला अडथळा येत असल्याचं सांगण्यात येतंय.
हा स्तंभ इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा देखील प्रस्ताव पुरातत्व विभागाने दिला आहे. मात्र हा कीर्तिस्तंभ हलवू नये अशी मागणी भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थसंरक्षणी महासभा यांनी केली आहे. महावीर कीर्तिस्तंभ सत्य, अहिंसेचा संदेश देतो. यातून एका विशिष्ट धर्माचा प्रसार होत नाही. तो तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या संमतीने बसवण्यात आला होता. पुरातत्त्व खात्याने तो येथे कायम ठेवावा. त्याला या ठिकाणाहून स्थलांतरित करण्यास आम्ही विरोध करू अशी भूमिका भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थसंरक्षणी महासभा यांनी घेतली आहे
'जिओ और जिने दो’ असा संदेश या कीर्तीस्तंभावर आहे. दोन वर्षांपूर्वी वेरूळच्या श्री पार्श्वनाथ ब्रह्मचर्याश्रम जैन गुरुकुलच्या वतीने 8 लाख रुपये खर्च करून स्तंभाचे सुशोभीकरण करण्यात आले. त्यावर ग्रॅनाइट आणि स्तंभाच्या शिखरावर वेळ आणि तापमान सांगणारे घड्याळ बसवण्यात आले होते. हा स्तंभ अहिंसा, प्रेम, क्षमा, करुणा याचे प्रतीक असल्याचे येथे नमूद आहे.
या स्तंभाच्या आजुबाजूला छोट्या छोट्या दुकानदारांनी अतिक्रमणनही केले. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो. केवळ एवढेच नाही तर लेणी बाजूचा असलेला रस्ताही हटवण्याची मागणी पुरातत्व विभागाने केली आहे. मात्र मुळातच हा स्तंभ हटवण्याचा विचार सुरू होताच त्याला विरोधही व्हायला सुरू झालाय. त्यामुळे पुरातत्व विभागाच्या वेरूळ लेणीच्या सुशोभीकरणाच्या योजनेचे पुढे काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha