(Source: ECI/ABP News/ABP Majha)
औरंगाबादमध्ये माथेरानचा फिल, पारा 5.4 अंशावर; 35 वर्षांचे रेकॉर्ड तोडले
Aurangabad Current Weather Update: उत्तरेकडे झालेला हिमवर्षाव आणि शितलहर याचा मोठा परिणाम वातावरणावर जाणवत आहे.
Aurangabad Current Weather Update: उत्तरेकडे झालेला हिमवर्षाव आणि शितलहर याचा मोठा परिणाम वातावरणावर जाणवत आहे. औरंगाबादेत आज सोमवारी रात्री रेकॉर्डब्रेक थंडीची नोंद झाली आहे. शनिवारी तापमान 9.4 असणारी थंडी आज 5.4 अंशावर पोहचले असून तब्बल 4 अंशाने पारा घसरला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत हुडहुडी जाणवली होती. तर रात्रीही थंडी कायम आहे. तर गेल्या 35 वर्षाचे रेकॉर्ड या थंडीने तोडले असून, रक्त गोठविणाऱ्या या थंडीने शहरवासिय मात्र हैराण झाले आहेत.
थंडीचा जोर वाढला...
यावर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही महिने फारसे थंडीचे राहिले नाही. त्यामुळे गतवर्षी प्रमाणे याही वर्षी थंडी दगा देते की काय अशी शंका व्यक्त होत होती. मात्र जानेवारी महिना उजाडताच तापमानात घट होऊ लागली. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ढगाळ वातावरण आणि दाट धुके असे वातावरण होते. मात्र 1 जानेवारीपासून आकाश निरभ्र झाले. 1 जानेवारीला तापमानात चांगलीच घट झाली किमान तापमान 9.4 एवढे राहिले. 6 जानेवारीला तापमान थोडे वाढले अन तापमान 13.2 वर पोहोचले खरे मात्र पुन्हा लगेच उतरले. 8 जानेवारीला पुन्हा 9.4 वर तापमानाचा काटा स्थिरावला. तर आज 9 जानेवारीला तब्बल 4 अंशाची घट होऊन तापमानाचा पारा 5.4 एवढा उतरला. गेल्या ३५ वर्षांत सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.
काय म्हणतात हवामात तज्ज्ञ ?
एमजीएम हवामानशास्त्र प्रमुख श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले की, तापमानातील ही घट दोन चार दिवसांपुरतीच आहे. उत्तरेकडील थंडी आता पश्चिमेकडे सरकत आहे. त्यामुळे शीतलहर आल्याचा भास होतो. अजून दोन तीन दिवस कडाक्याची थंडी राहू शकते. त्यामुळे आजारी, वृद्ध व्यक्तींनी काळजी घेण्याची गरज आहे. या थंडीचा रब्बी गहू आणि हरबरा या पिकांना लाभ होणार आहे. तर निवृत्त शासकीय अधिकारी आणि हवामान तज्ज्ञ उदय देवळाणकर म्हणाले. बर्फवृष्टी आणि उत्तरेकडील थंड वारे यामुळे गारठा वाढला आहे. अजून तापमान कमी होऊ शकते, म्हैसमाळ आणि खुलताबाद परिसरात ५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली येण्याची शक्यता आहे.
आजार वाढणार!
औरंगाबाद जिल्ह्यातील पारा अचानक घसरल्याने सर्वत्र हुडहुडी पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशात सर्दी, खोकला, ताप असे आजार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच कधी थंडी तर कधी गरम वातावरण असल्याने आजार वाढले असून, रुग्णालयात गर्दी पाहायला मिळत आहे. अशात पारा 5.4 वर घसरल्याने थंडीमुळे आजाराचे प्रमाण देखील वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. विशेष करून लहान मुलांची काळजी घेणं अधिक महत्वाचे आहे.
कुठे किती किमान तापमान? (अंश सेल्सिअसमध्ये)
- जळगाव - 5
- औरंगाबाद - 5.4
- पुणे - 8.6
- नागपूर - 8.5
- परभणी - 9.5
- सातारा - 11.9
- नांदेड - 10.6
- उदगीर - 10.3
- महाबळेश्वर - 11.1
- जालना - 11
- सांगली - 13.1
- सोलापूर - 12
- कुलाबा - 22
- रत्नागिरी - 19.5
- डहाणू - 17.3
- नाशिक - 8. 7
- मालेगाव - 12.4
- कोल्हापूर - 15