'निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे'चं अजब बॅनर लावणं महागात; भाजप आक्रमक, औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गुलमंडीमध्ये निवडणूक लढवण्यासाठी बायको हवी असल्याचं बॅनर लावण्यात आलं होतं. असे अजब बॅनर लावणं अखेर संबंधितांना महागात पडलं आहे.
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एक वेगळा बॅनर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अर्थात हा बॅनर आता काढला गेला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गुलमंडीमध्ये निवडणूक लढवण्यासाठी बायको हवी असल्याचं बॅनर लावण्यात आलं होतं. असे अजब बॅनर लावणं अखेर संबंधितांना महागात पडलं आहे. या प्रकरणी रमेश विनायकराव पाटील यांच्यावर अखेर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनधिकृत बॅनर लावल्या प्रकरणी महानगरपालिका कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप महिला आघाडी आक्रमक
दरम्यान औरंगाबादेतील या बॅनरविरोधात भाजप महिला आघाडी आक्रमक झाली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांनी विवादित बॅनरवर शाईफेक करत बॅनर फाडला होता. बॅनर लावणाऱ्या रमेश पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महिला कार्यकर्त्यांनी केली होती.
औरंगाबाद गुलमंडी ही शहराचा मुख्य बाजारपेठ आहे. पुण्यातली मंडई तशी औरंगाबाद गुलमंडी. औरंगाबादेतील असा एकही व्यक्ती नसेल की ज्याने गुलमंडीमध्ये खरेदी केली नाही. याच गुलमंडीतलं एक बॅनर सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होतं. हे बॅनर रमेश पाटील यांनी लावलं होतं. तीन अपत्य असल्यामुळे 2022 ची महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी बायको हवी आहे असं या बॅनर कम जाहिरातमध्ये म्हटलं होतं. सोबत पाटलांनी संपर्कासाठी नंबरही दिला आहे.
रमेश पाटील यांना औरंगाबाद महानगरपालिकेची येऊ घातलेली निवडणूक लढवायची आहे. पण नियमामुळे तीन अपत्य असल्याने त्यांना निवडणूक लढवता येत नाही. त्यासाठीच त्यांनी आता दुसऱ्या पत्नीचा शोध सुरू केला आणि त्यासाठी हे बॅनर लावले.
... म्हणून दुसऱ्या बायकोचा शोध सुरू
माहितीनुसार, रमेश यांनी यापूर्वी कधीही निवडणूक लढवलेली नाही. पण त्यांच्या मते ते वार्डात गेल्या काही वर्षांपासून काम करतात. अनेक सामाजिक कार्य त्यांनी केलेले आहेत असा त्यांचा दावा आहे. लोकांची इच्छा आहे की त्यांनी नगरसेवक पदाच्या निवडणुकीत उभं रहावं. पण नियमांची आडकठी असल्यामुळे त्यांना उभा राहता येत नाही. ते ज्या भागात राहतात त्या भागातल्या पाण्याचा प्रश्न आणि इतर प्रश्न सोडवण्याचा देखील त्यांनी दावा केला आहे. त्यांनी उभ्या केलेल्या मनसेच्या उमेदवाराला चांगली मतं पडली होती असा त्यांचा दावा आहे. नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवण्याची इच्छा असली तरी नियम आडवे येतात म्हणून त्यांनी दुसऱ्या बायकोचा शोध सुरू केला आहे.