(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जी 20 परिषदेचं शिष्टमंडळ देणार औरंगाबादच्या विद्यापीठ लेणी, मकबरा, सोनेरी महालाला भेट
Aurangabad News: जी-20 परिषदेच्या निमित्ताने विदेशातील महिला प्रतिनिधींचे शिष्टमंडळ 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी येणार आहे.
Aurangabad News: पर्यटनाची राजधानी तथा ऐतिहासिक औरंगाबादेत जी-20 परिषदेच्या निमित्ताने विदेशातील महिला प्रतिनिधींचे शिष्टमंडळ 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी येणार आहे. हे शिष्टमंडळ ऐतिहासिक वारसास्थळ बीबीका मकबरा, विद्यापीठ लेणी, सोनेरी महालला भेट देणार असल्याची माहिती औरंगाबाद महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने प्रशासनकडून तयारी करण्यात येत आहे.
जी-20 परिषदेचं अध्यक्षपद यंदा भारताला मिळालं आहे. त्यामुळे जी-20 परिषदेच्या निमित्ताने जगभरातील वेगवेगळ्या देशातील परदेशी पाहुणे भारतात येत आहे. दरम्यान, 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी याच जी-20 परिषदेच्या निमित्ताने विदेशातील महिला प्रतिनिधींचे शिष्टमंडळ औरंगाबादमध्ये येणार आहे. तर औरंगाबादमध्ये येणारे हे पाहुणे ऐतिहासिक वारसास्थळ बीबीका मकबरा, विद्यापीठ लेणी, सोनेरी महालाला भेट देणार आहेत. त्यामुळे या सर्व मार्गावर सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरण करण्यात येत आहे.
असा असणार दौरा...
महापालिकेच्या वतीने जी-20 परिषदेच्या निमित्ताने शहरात सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. ही कामे 15 फेब्रुवारीपर्यंत संपविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विदेशातून येणाऱ्या महिला प्रतिनिधींची राहण्याची व्यवस्था हॉटेल रामा इंटरनॅशनल, हॉटेल विवांतामध्ये करण्यात आली आहे. दोन दिवस दौऱ्यात भरगच्च कार्यक्रम असल्यामुळे शहरातील पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी केवळ दोन तासांचा वेळ आहे. या संदर्भात माहिती देताना प्रशासक डॉ. चौधरी म्हणाले की, जी-20 परिषदेतंर्गत प्रतिनिधीचे शिष्टमंडळ येणार आहे. या शिष्टमंडळाचा दोन दिवसीय कार्यक्रम ठरलेला आहे. शहरातील ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासाठी दोन तासांचा वेळ ठेवण्यात आला आहे. त्यात बीबीका मकबरा, विद्यापीठ लेणी आणि सोनेरी महाल या स्थळांना भेटी देणार आहेत.
महिनाभरापासून युद्धपातळीवर सुरू
जी 20 परिषदेच्या शिष्टमंडळाच्या बैठकीच्या तयारीसाठी संपूर्ण प्रशासन महिनाभरापासूनच कामाला लागले आहे. बैठकीच्या निमित्ताने आवश्यक कामे करण्यासाठी राज्य सरकारने महापालिकेला 50 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यातून रस्त्यांची डागडुजी, दुभाजकांची डागडुजी, दुभाजकातील वृक्षारोपण, सुशोभीकरण, रंगरंगोटी, उड्डाणपुलांवर रंगकाम, विद्युत रोषणाई, ग्लो गार्डन विकसित करणे आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. सोबतच शिष्टमंडळ ज्या मार्गाने जाणार आहे, त्या रस्त्यांवर असलेले सर्व अतिक्रमण काढून घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरात शेकडो अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले आहे. तसेच, गेल्या महिनाभरापासून ही कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
महत्वाच्या इतर बातम्या :
औरंगाबाद गर्भपात प्रकरणात मोठा खुलासा; आरोपी दाम्पत्याकडे डॉक्टरकीचा परवानाच नाही?