औरंगाबाद गर्भपात प्रकरणात मोठा खुलासा; आरोपी दांपत्याकडे डॉक्टरकीचा परवानाच नाही?
Aurangabad Abortion News: एका महिलेचा गर्भपात केल्यावर तिची प्रकृती बिघडल्याने हा सर्व प्रकार समोर आला आहे.
Aurangabad Abortion News: औरंगाबाद गर्भपात प्रकरणात (Aurangabad Abortion Case) आता आणखी नवीन खुलासा झाला असून, आरोपी डॉ. अमोल जाधव आणि डॉ. सोनाली उद्धव काळकुंबे-जाधव या दांपत्याकडे रुग्णालय चालवण्याचा परवानाच नसल्याचं समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. तर गेल्या तीन-चार वर्षांपासून अवैध गर्भपात केंद्र सुरू असताना याची आरोग्य विभागाला माहिती कशी मिळाली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एका महिलेचा गर्भपात केल्यावर तिची प्रकृती बिघडल्याने हा सर्व प्रकार समोर आला आहे.
औरंगाबादच्या चित्तेगाव येथील पांगरा रोडवर औरंगाबाद स्त्री रुग्णालय म्हणून, गेल्या तीन-चार वर्षांपासून जाधव दांपत्य हॉस्पिटल चालवत होते. डॉ. अमोल जाधव आणि डॉ. सोनाली उद्धव काळकुंबे-जाधव या पती पत्नीकडून रुग्णालयात थेट गर्भपात करण्यात येत होते. दरम्यान, शनिवारी रात्री आरोग्य विभाग आणि पोलिसांनी या रुग्णालयात छापेमारी करत गर्भपात करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि औषधी जप्त केल्या आहेत. तर दोन्ही डॉक्टर पती-पत्नी फरार झाले असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
आरोपी दांपत्याकडे 'डॉक्टर'कीचा परवानाच नाही
औरंगाबादच्या चित्तेगावात गर्भपात केंद्र चालवले जात असल्याची माहिती मिळताच, बिडकीन पोलीस आणि आरोग्य विभागाने छापेमारी केली. दरम्यान, यावेळी आरोग्य विभागाने रुग्णालयातील कागदपत्रे आणि इतर गोष्टी तपासल्या असता या डॉक्टर दांपत्याकडे डॉक्टरकीचा परवानाच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोणतीही डिग्री नसताना बिनधास्तपणे एवढे मोठे रुग्णालय कसे चालत होते? आरोग्य विभागाला याची कुणकुण कशी लागली नाही? आरोग्य विभागाचे भरारी पथक काय करत होते? असे प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणाचा हा मोठी अपयश असल्याचे बोलले जात आहे.
काय आहे प्रकरण?
बुलढाणा जिल्ह्यातील एक 27 वर्षीय महिला गुरुवारी 2 जानेवारीला घाटी रुग्णालयात दाखल झाली होती. तिचा अधिकचा रक्तस्त्राव होत असल्याने प्रकृती चिंताजनक असताना तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शासकीय डॉक्टरांनी तिच्यावर तत्काळ उपचार सुरू केले. मात्र तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे समोर आले. त्यामुळे याची माहिती तात्काळ बिडकीन पोलिसांना डॉक्टरांनी दिली. तेव्हा पोलीस आणि आरोग्य विभाग यांनी गर्भपात करण्यात आलेल्या चित्तेगाव येथील रुग्णालयात छापेमारी केली. यावेळी डॉक्टर पती-पत्नी फरार झाले. तर पथकाला रुग्णालयात गर्भपात करणाऱ्या वस्तू आणि औषधे मिळून आले आहे.
डॉक्टर दांपत्य फरार...
या प्रकरणात औरंगाबादच्या बिडकीन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांकडून आरोपीच्या शोधात पथक रवाना करण्यात आले आहे. मात्र अजूनही डॉक्टर दांपत्य पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. तर आरोग्य विभागाने रुग्णालयात पंचनामा करत, रुग्णालयातील औषधांचा साठा ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी पुढील तपास बिडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मोठी बातमी: परळीतील मुंडे गर्भपात प्रकरणाची औरंगाबादमध्ये पुनरावृत्ती; डॉक्टर पती-पत्नी फरार