औरंगाबादेतील 80 वर्षाचा 'तरुण' अन्नदाता, कोरोना काळात रोज 700 रुग्णांना मोफत जेवण
राजकुमार खिवंसरा यांच्या या उपक्रमात गेल्या आठ वर्षांपासून कधीही खंड पडला नाही. सुरुवातीला स्वखर्चातून आणि नंतर लोक या उपक्रमाला देणगीही द्यायला लागले.
औरंगाबाद : कोविडमुळे सगळीकडे सध्या नकारात्मक बातम्या आपण पाहतो आहोत. पण या संकटाच्या काळात असेही काही लोक आहेत जे आपल्या कृतीतून सकारात्मक वातावरण निर्माण करतात आणि कोविडशी लढण्याची प्रेरणा देतात. असेच एक 80 वर्षीय राजकुमार खिवंसरा ते रोज स्वखर्चानं रोज 700 पेक्षा अधिक रुग्णांना भरपेट जेवण देतात. त्यांचा हा उपक्रम गेल्या आठ वर्षांपासून अविरत सुरु आहे.
जेवणामध्ये एक भाजी, 4 पोळ्या, भात आणि वरण असं पॅकिंग होतं. नंतर रुग्णालयात रुग्णांना जेवण पोहोचवलं जातं. उत्तम आणि चांगल्या प्रतीचे जेवण दिलं जात असल्यामुळे रुग्णांना घरच्या डब्याची आठवण येत नाही. कारण रुग्णांना जे हवं असतं ते जेवण तयार करून पाठवलं जातं. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते.
औरंगाबाद शहरामध्ये सुरुवातीला अंशतः लॉकडाऊन होते. त्यानंतर राज्य सरकारने कडक निर्बंध लावल्यानंतर सर्वसामान्य रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण कुठे करायचं असा प्रश्न होता. त्याचे उत्तर रुग्णालयातच मिळालं. रुग्णालयातच चहा, नाश्ता सोबतच दोन वेळचा डबा मिळतो. सोबतच रुग्णाला आवडेल असं कधी आवळा कॅन्डी तर कधी गोड धोड दिलं जातं. बाहेर गावाहून उपचारासाठी औरंगाबाद शहरात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रश्न पडायचा की आपल्या रुग्णाला डबा कुठून आणायचा, पण त्याची चिंताच मिटली आहे. सोबतच रुग्णांच्या नातेवाईकांनाही हॉस्पिटल परिसरात जेवण मिळत आहे.
राजकुमार खिवंसरा यांच्या या उपक्रमात गेल्या आठ वर्षांपासून कधीही खंड पडला नाही. सुरुवातीला स्वखर्चातून आणि नंतर लोक या उपक्रमाला देणगीही द्यायला लागले. या उपक्रमाची सुरुवात झाली कशी तर एकदा घडलं असं की, एकदा राजकुमार यांची पत्नीच आजारी पडली. त्यांच्या शेजारी बसून असताना लक्षात आलं, की ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांची सोय नसल्यानं तशी अडचणच होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी मित्र परिवारांत आणि शेजारीच्या मंडळींना सांगितलं. रुग्णांना मोफत जेवण द्यायचं का? अनेकांनी प्रतिसाद दिला आणि औरंगाबाद शहरातील हेडगेवार रुग्णालयात मोफत भोजन देण्याच्या उपक्रमाला दीड वर्षांपूर्वी सुरुवात झाली. आता दर महिन्याला 70 हजार रुपये कोणाकडेही देणगी न मागता गोळा होतात. त्यातून रुग्णालयातील प्रत्येकाला नाश्ता, भोजन दिले जाते. सध्या 700 लोकांना जेवण देतात.
औरंगाबाद शहरातील काल्डा कॉर्नर भागात त्यांनी आता स्वयंपाकघर बनवलं. सकाळी नाश्ता तयार झाला, की राजकुमार खिंवसरा आणि मांगिलाल चंडालिया, प्रेमचंद मुथा आदी मंडळी जमतात व प्रत्येक रुग्णाला नाश्ता देतात. दुपारी पोळी-भाजी, भात असं भोजन दिलं जातं. एखाद्या रुग्णाला खाण्याचाच त्रास असेल, तर अगदी भाताची पेजसुद्धा दिली जाते. रात्री खिचडी, त्यावर तूप असायलाच हवे असा खिंवसरांचा आग्रह असतो. त्यासाठी लागणारे पैसे ते स्वत: देतात. खरे तर या कामासाठी खिशातून किती पैसे खर्च झाले, याचा हिशेब त्यांनी कधी ठेवलाच नाही.
कोंविडच्या काळात अनेक संकट आ वासून उभा आहेत. रुग्ण कसा बरा होईल याच्या चिंतेत असलेल्या लोकांना भरपेट जेवण देऊन त्यांच्या तृप्तीचा आनंद देणारे खिवंसरा काकाचा आदर्श निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. त्यांच्या या कार्याला एबीपी माझाचा सलाम आणि शुभेच्छा.