Accident : नागपूर-औरंगाबाद महामार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक, चौघांचा घटनास्थळी मृत्यू
अपघात झाल्यानंतर नागपूर-औरंगाबाद महामार्गावर आता पर्यत वाहनांच्या 20 किलोमीटर पर्यत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र पोलीसांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली.
अमरावतीः नागपूर-औरंगाबाद महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री 12 ते 1 दरम्यान अमरावती जिल्ह्यातील शिंगणापूर चौफुली समोर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की परिसरात मोठ्याने आवाज आला. दोन्ही ट्रकमधील चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर दोन्ही ट्रकचे प्रचंड नुकसान झाले आहे.
औरंगाबाद कडून नागपूरकडे जाणारा ट्रक क्रमांक CG04HZ 8154 होता. शिंगणापूर फाट्यावरून पाचशे मीटर अंतरावर RJ04 GC2258 नागपूर कडून औरंगाबाद कडे जाणारा ट्रक होता. दोन्ही ट्रक एकमेकांवर कोसळले. परिसरात महामार्गावरील खड्डा वाचवताना अपघात झाल्याचं बोलल्या जात आहे. अपघात झाल्यानंतर नागपूर-औरंगाबाद महामार्गावर आता पर्यत वाहनांच्या 20 किलोमीटर पर्यत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न सुरू केला. क्रेनच्या मदतीने दोन्ही ट्रक रस्त्याच्या बाजूला करण्यात आले. मात्र महामार्गावरील खड्डयांचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला असून हे खुड्डे केव्हा बुजवणार आणि महामार्गावरील खड्डे आणखी किती प्रवाश्यांचा जीव घेणार असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.