Amravati Crime: अमरावती हादरलं, एकाच दिवसात दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सात जणांना अटक
Amravati Crime: बोरं आणि मध देण्याच्या बहाण्याने एका साडे बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहिमापूर जवळील शेतशिवारत अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
अमरावती : अमरावती जिल्ह्यात (Amravati District) एकाच दिवसात दोन अत्याचाराच्या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही घटनेतील पीडिता या अल्पवयीन आहेत. अमरावतीच्या वरुड तालुक्यातील शेंदुर्जना घाट पोलिस स्टेशन हद्दीतील सातनुर गावात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी काल सात आरोपींना अटक केली आहे ज्यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे.
अल्पवयीन पीडितेने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटलं की, तिच्या ओळखीतील एका महिलेने मनीष सदापुरे यांच्या घरी बोलावत असल्याचा निरोप पीडितेला दिला. पीडिता त्या युवकाच्या घरी पोहचल्यावर तेथे आधीच दबा धरून बसलेले चार युवक किचनमधून बाहेर आले. त्यानंतर पाचही आरोपींनी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. निरोप देणाऱ्या महिलेने यावेळी घराचे दार बाहेरून बंद करून ठेवल्याचे देखील तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर कशीबशी सुटका करून ही तरुणी आपल्या घरी पोहचली. मात्र या घटनेच्या आठ दिवसांनी आरोपींपैकी एक असलेला हर्षल गोहत्रे याने या मुलीला पुन्हा महत्त्वाचे बोलायचे आहे असे सांगून भेटायला बोलावले. त्यानंतर आठ दिवस आधी झालेल्या अत्याचाराची घटना सर्वांना सांगण्याची धमकी देऊन पुन्हा अत्याचार केला. यावेळी हर्षलचा मित्र कपिल तिडके देखील सहभागी होता.
दोनवेळा झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने याबद्दल आपल्या पालकांना सांगितले. त्यानंतर लगेच 17 डिसेंबरला रात्री शेंदूरजना घाट पोलिसांना तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी काल मनीष सदापुरे (25),अमोल बोके (24), पियुष डोके (22), केशव वंजारी (27), हर्षल गोहत्रे, कपिल तिडके (24) आणि एका 47 वर्षीय महिला अशा सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दुसरी घटना
बोरं आणि मध देण्याची बतावणी करून एका साडे बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहिमापूर जवळील शेतशिवारत अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बबलू हरणे (वय 44) याला पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
अल्पवयीन मुलगी शनिवारी दुपारी आपल्या आजीसह शेतात तुरीच्या शेंगा तोडण्यासाठी गेली असता आरोपी बबलू हरणे याने तिला बोरं आणि मध देण्याच्या बहाण्याने बाजूच्या शेतात घेऊन गेला. शेतात तिच्यावर अत्याचार केला. आजीला आपल्या नातीचा ओरडण्याचा आवाज आल्यानंतर पाहिले असता मुलगी जमिनीवर पडल्याचे आढळून आले. आजीने विचारपूस केल्यानंतर अत्याचाराची घटना उघड झाली. यासंदर्भात शनिवारी रात्री पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर आरोपीला काल रविवारी अटक करण्यात आली आहे.