(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवसेनेच्या धनुष्यबाणाला चोरणारे भाजप आणि शिंदे रावण; आता ठाकरेंच्या आमदाराचा तोल सुटला
Maharashtra Politics : शिवसेनेच्या धनुष्यबाणाला चोरणारे भाजप आणि शिंदे हे रावण आहेत, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाच्या आमदाराने केले आहे. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
अकोला : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची जीभ छाटणाऱ्यास अकरा लाखांचे बक्षीस देऊ, असे वादग्रस्त वक्तव्य केलेल्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर आज पुन्हा संजय गायकवाड यांनी अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि अरविंद सावंत (Arvind Sawant) यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. आमदार दानवे म्हणजे गल्लीतील Xत्रा आहे. तो मागच्या धारा निवडून येतो. अरविंद सावंतची माझ्यावर बोलण्याची औकात नाही, असे त्यांनी म्हटले. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांचा तोल सुटला आहे.
बाळापूरचे शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. त्यांनी भाजप (BJP) आणि शिंदे गटाला थेट रावणाची उपमा दिली आहे. ते अकोल्यात बाळापूर मतदार संघातील ठाकरे गटाच्या शाखाप्रमुख आणि उपशाखाप्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते. याच मेळाव्यात नितीन देशमुख यांनी बाळापुरातून शिंदे गटाचे डिपॉझिट जप्त न केल्यास राजकारणात राहणार नसल्याचं वक्तव्य केले आहे. आमदार नितीन देशमुख यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. नाना पटोलेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी करणाऱ्या नेत्यांवरही त्यांनी पलटवार केलाय. शिवसेना सोबत असल्यामुळेच काँग्रेस एका खासदारावरून तेरा खासदारांपर्यंत गेल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेच्या धनुष्यबाणाला चोरणारे भाजप आणि शिंदे रावण
नितीन देशमुख म्हणाले की, शिवसेनेच्या धनुष्यबाणाला चोरणारे भाजप आणि शिंदे हे रावण आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस आणि प्रत्येक हिंदुत्ववाद्याची इच्छा आहे. महाविकास आघाडीने त्यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावं. शिवसेना सोबत असल्यामुळेच काँग्रेस एका खासदारावरून 13 खासदारावर गेली आणि भाजप 23 खासदारांवरून नऊ खासदांरावर आली. शिंदे गटाच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त केलं नाही तर मी राजकारणात राहणार नाही़.
शिंदे गटाचं हिंदुत्व आता कुठे गेलंय?
सुरत आणि गुवाहाटीत शिंदे गटात आपला घातपात करण्याचा प्रयत्न होता, असा खळबळजनक आरोप नितीन देशमुख यांनी पुन्हा एकदा केला आहे. आपल्या निवडणुकीवर सुरत आणि गुवाहाटीचं लक्ष असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ठाकरे गटावर हिंदुत्व विसरण्याचा आरोप करणाऱ्या शिंदे गटावरही त्यांनी जोरदार पलटवार केलाय. मुंबईत बुरखे वाटपाचा कार्यक्रम करणाऱ्या शिंदे गटाचं हिंदुत्व आता कुठे गेलंय? असा सवालही त्यांनी केलाय. दरम्यान, नितीन देशमुख यांनी आज मतदारसंघातील पहिल्यांदाच मतदान करीत असलेल्या 30 हजार मतदारांना पत्र लिहिलंय. बाळापुर मतदार संघात विधानसभा निवडणुकीसाठी 3 लाख 10 हजार मतदार असणार आहेत. ही सर्व पत्र उद्या पक्षाचे शाखाप्रमुख आणि उपशाखाप्रमुख नवमतदारांना घरी नेऊन देणार आहेत.
आणखी वाचा
मोठी बातमी ! ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळास कॅबिनेटची मंजुरी