Kalicharan Maharaj Profile: आठवी पास अभिजीत धनंजय सराग कसा बनला कालीचरण महाराज?
Kalicharan Maharaj Profile : कालीचरण महाराज वादग्रस्त वक्तव्यांमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. जाणून घेऊया आठवी पास अभिजीत धनंजय सराग कसरा बनला कालीचरण महाराज आणि त्याची वादग्रस्त वक्तव्ये
Kalicharan Maharaj Profile : कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) वादग्रस्त वक्तव्यांमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीका-टिप्पणी केल्याप्रकरणी कालीचरण महाराज याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन तो 95 दिवस तुरुंगात होता. देवी देवता हिंसक होते म्हणून आपण त्यांची पूजा करतो. तसंच देशासाठी आणि धर्मासाठी हत्या केली तर त्यात वावगं काहीच नाही अशी वादग्रस्त वक्तव्ये कालीचरण महाराजने नुकतीच केली होती. जाणून घेऊया कालीचरण महाराज याची कहाणी...
कोण आहे कालीचरण महाराज?
'कालीचरण महाराज' अकोल्यातील (Akola) जुने शहर भागातील शिवाजीनगरमध्ये 'भावसार पंचबंगला' भागात राहतो. अकोल्यातील तरुणाईमध्ये या महाराजाची मोठी क्रेझ आहे. मात्र, कालीचरण आपल्या भूतकाळाविषयी फारसं काही कुणाला सांगत नाही. त्याचं मूळ नाव 'अभिजीत धनंजय सराग' आहे. शिवाजीनगर भागातील धनंजय आणि सुमित्रा सराग या दाम्पत्याच्या पोटी कालीचरण महाराज याचा जन्म झाला. लहानपणी अभिजीत अत्यंत खोडकर होता. त्याला शाळेतही जाण्याचा कंटाळा यायचा. लहानपणापासून त्याचा ओढा अध्यात्माकडे अधिक होता. त्यातही तो कालीमातेची आराधना करायचा. घरच्यांना तो शिकावा, काहीतरी वेगळं काम करावं असं वाटायचं. मात्र, या परिस्थितीतही त्याचा अध्यात्मावरचा विश्वास आणि ओढा वाढत गेला. पुढे अभिजीतचा 'कालीपुत्र कालीचरण' झाला. पुढे लोकांनी त्याला 'महाराज' संबोधणं सुरु केलं. मात्र, 'कालीचरण महाराज' स्वत: आपण महाराज नव्हे तर कालीमातेचा भक्त आणि पुत्र असल्याचं सांगतो.
कालीचरण महाराजबद्दल संक्षिप्त माहिती
1) कालीचरण महाराजचं मूळ नाव अभिजीत धनंजय सराग.
2) अकोल्यातील जुने शहर भागातील शिवाजीनगर भागातील भावसार पंच बंगल्याजवळ वास्तव्य.
3) आठव्या वर्गापर्यंत शिक्षण. अध्यात्माकडील ओढ्यामुळे शिक्षण सोडलं. हरिद्वारला जात दीक्षा घेतली.
4) कालीभक्त म्हणून कालीचरण महाराज नाव धारण केलं. दोन वर्षांपूर्वी शिवतांडव स्तोत्र व्हिडीओमुळे देशभरात लोकप्रिय. कट्टर हिंदुत्ववादाचे पुरस्कर्ता.
5) 2017 मध्ये अकोला महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत.
6) बॉडीबिल्डिंग आणि जिमबद्दल कालीचरण प्रचंड क्रेझी.
कालीचरण महाराजची वादग्रस्त वक्तव्ये
डिसेंबर 2021 : रायपूर येथील धर्मसंसद
"राजकारणातून राष्ट्र काबीज करणे हे इस्लामचे ध्येय आहे. आमच्या डोळ्यांसमोर त्यांनी 1947 मध्ये ते ताब्यात घेतले. त्यांनी यापूर्वी इराण, इराक आणि अफगाणिस्तानवर कब्जा केला होता. नंतर त्यांनी राजकारणातून बांगलादेश आणि पाकिस्तान काबीज केले होते. मोहनदास करमचंद गांधी यांची हत्या केल्याबद्दल मी नथुराम गोडसेला सलाम करतो."
25 डिसेंबर 2022 : अमरावती येथील धर्मसभेत
"आपले हिंदू देव देवता हिंसक असल्यामुळेच आपण त्यांची पूजा करतो. तर हिंदू धर्मातील देवी देवतांनी आपल्यासाठी मारामाऱ्या केल्याच नसत्या तर आपण त्यांना पूजले असते का? त्याचबरोबर धर्मासाठी आणि देशासाठी खून करणे वाईट नाही".
मे 2022 : अलिगड संतसंगम
"हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी सर्व हिंदूंनी एक व्हायला हवं. धर्माच्या आधारे मत द्यायला पाहिजे. हिंदूंनाच मतदान द्या, भारतात केवळ सनातन धर्म आहे. इस्लाम, ख्रिश्चन हे धर्मच नाहीत."
"भारत पाकिस्तान युद्ध झालं तर इथले मुसलमान पाकिस्तानला साथ देतील".
15 डिसेंबर 2022 : हिंदू जनआक्रोश मोर्चा, अहमदनगर
"देशात रोज 40 हजार लव्ह जिहादची प्रकरणे होतात. यासाठी वशीकरण आणि जादूटोण्याचा वापर केला जातो. आता याच्यावर उपाय काय तर त्यासाठी डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा आणि सकाळी ते पाणी मुलीला प्यायला द्या मग बघा डोकं ठिकाणावर येईल. सर्व भूत, प्रेम, तंत्र मंत्र बाहेर येईल".
5 मे 2022 : सोलापूर
"राज ठाकरे हे एकटेच मर्द आहेत, बाकी सगळे नामर्द".
संबंधित बातमी
Nashik Kalicharan Maharaj : 'इस्लाम हा धर्मच नाही', नाशिकमध्ये कालिचरण महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य