Shirdi : स्थानिक वृत्तवाहिनी प्रतिनिधी आणि रिक्षा चालकामुळे बेपत्ता वडिलांचा मुलाला लागला शोध, साईंच्या शिर्डीत चित्रपटाला साजेशी कहाणी
Shirdi Missing Case : ओडिशातून साईंच्या दर्शनाला आलेल्या आणि आठ दिवसांपूर्वी गायब झालेल्या वयोवृद्ध नागरिकाचा शोध लागला. त्यासाठी स्थानिक वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी आणि रिक्षाचालकाचे कौतुक केले जात आहे.
अहमदनगर: साईंच्या शिर्डीमध्ये (Shirdi Sai Baba Temple) एखाद्या चित्रपटाला साजेशी कहाणी घडली असून ओडिशाहून आलेल्या आणि बेपत्ता झालेल्या वृद्धाची आणि त्याच्या मुलाची भेट घडली. ही भेट एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधी आणि एका रिक्षा चालकाच्या प्रयत्नांमुळे झाली. स्थानिक वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल आणि अख्तर पठाण या रिक्षाचालकाचे त्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
12 डिसेंबरला ओडिशा राज्यातून कुटुंबासह आलेला 72 वर्षीय वृद्ध नागरिक साईंच्या दर्शनाला आला आणि बेपत्ता झाला. मुलाने पोलीस ठाण्यात मिसिंग देखील दाखल केली आणि वडिलांचा शोध घेत असताना स्थानिक वृत्त वाहिनीच्या प्रतिनिधीने त्याला मदत केली. त्यानंतर शिर्डीपासून 14 किमी अंतरावर असणाऱ्या पुणतांबा गावातील रिक्षा चालकाला बेपत्ता व्यक्ती दिसली त्याने त्यास पोलीस ठाण्यात आणले. त्यामुळे अखेर आठ दिवसानंतर मुलाची आणि वडिलांची भेट झाली.
दर्शनाला गेले आणि बेपत्ता झाले
ओडिशा राज्यात राहणारे 72 वर्षीय बैरागी राऊत आपल्या कुटुंबासह 12 डिसेंबरला साईंच्या दर्शनाला आले. हॉटेलमध्ये थांबले असताना बैरागी दर्शनाला जातो असं सांगत बाहेर पडले आणि बेपत्ता झाले. त्यानंतर मुलगा अजितने बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर शिर्डी पोलिस ठाण्यात मिसिंग देखील दाखल केली.
फोटो व्हायरल झाला आणि रिक्षाचालकाने ओळखले
वडिलांचा शोध लागत नसल्याने मुलगा अजित साईबाबांच्या चरणी रोज प्रार्थना करत असताना स्थानिक वृत्त वाहिनीचे प्रशांत अग्रवाल यांना ही माहिती समजली. त्यांनी हरवलेल्या नागरिकाचा फोटो व्हायरल केला. दरम्यानच्या काळात पुणतांबा येथील रिक्षा चालकावा अनोळखी वयोवृद्ध इसम दिसून आला. त्यांनी विचारपूस देखील केली आणि त्यांना जेवण दिले. मात्र भाषा समजत नव्हती. पण सोशल मीडियावर पाहिलेला फोटो आणि समोरची व्यक्ती एकच आहे हे समजताच थेट शिर्डी पोलीस ठाणे गाठत त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
बेपत्ता व्यक्ती आणि समोरची व्यक्ती एकच असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी मुलगा अजित व बैरागी यांची भेट घडवून आणली. त्यानंतर त्या मुलाने रिक्षाचालकांना मारलेली मिठी पाहून अनेकांना आनंद झाला.
सर्वधर्म समभावाचा संदेश देणार देवस्थान अशी ओळख असणाऱ्या साईंच्या शिर्डीत स्थानिक वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल आणि अख्तर पठाण या रिक्षाचालकामुळे आठ दिवसानंतर वडील- मुलाची झालेली भेट हा साईबाबांचा आशीर्वाद असल्याची चर्चा शिर्डीत सध्या सुरू आहे.
ही बातमी वाचा :