Shirdi Sai Baba : शिर्डीच्या साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय, साईभक्तांनी दान केलेलं रक्त आता गरजूंना मोफत मिळणार
शिर्डी : साईबाबा संस्थानच्या झालेल्या त्रिसदस्यीय समितीच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. यात नवीन दर्शनपासेस पॉलिसी, डोनेशन पॉलिसी, रक्तदान पॉलिसी, साईमंदिर निर्माण पॉलिसी, देशव्यापी मंदिर असोसिएशनची स्थापना आदीं घोषणा केल्या आहेत.

शिर्डी (Shirdi) : साईबाबा संस्थानच्या (Shirdi Sai Baba) झालेल्या त्रिसदस्यीय समितीच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. यात नवीन दर्शनपासेस पॉलिसी, डोनेशन पॉलिसी, रक्तदान पॉलिसी, साईमंदिर निर्माण पॉलिसी, देशव्यापी मंदिर असोसिएशनची स्थापना आदीं घोषणा केल्या आहेत. या सर्व योजनांबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी भाविक आणि ग्रामस्थांकडून सूचना मागवण्यात येणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे (Shri Saibaba Sansthan Trust) सीईओ पी. शिवा शंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रुग्णांना मोफत रक्त
साईबाबा संस्थानमार्फत मंदिर परिसरात रक्तदान वाढीसाठी भाविकांकडून रक्तदान केले जाते. यापुढे दानात मिळालेले रक्त रुग्णांना मोफत देण्यात येणार आहे. इथे काही बाहेरील रक्तपेढ्याही रक्तसंकलन करतात. त्यांनाही हे रक्त मोफतच द्यावे लागणार आहे. याबाबत संस्थानकडून संबधित रुग्णांशी संपर्क करुन खातरजमा करण्यात येणार आहे. या रक्त पिशव्यांवर संस्थानचा टॅग असेल आणि नॉट फॉर सेल लिहिलेले असेल, अशी घोषणा करण्यात आली आहे.
भाविकांची दिशाभूल करणाऱ्या एजंटवर कारवाई करणार
दरम्यान शिर्डीतील एका माजी नगरसेवकाने सोमवारी जादा पैसे घेऊन भाविकांना दर्शनपास विकल्याची तक्रार संस्थानकडे प्राप्त झाली होती. या पार्श्वभूमीवर संस्थानने पोलिसात तक्रार देण्याचा निर्णय घेतला आहे. आरती आणि दर्शन पासेसमध्ये होणारा गैरवापर रोखण्यासाठी साईंच्या आरतीचे सशुल्क पासेससाठी शिफारस करताना यापुढे सर्व भाविकांचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर द्यावे लागणार आहेत. पासेस कन्फर्मेशनबाबत संबंधित भाविकाच्या मोबाईलवर मेसेज पाठवला जाणार आहे. येत्या शुक्रवारपासून (29 सप्टेंबर) प्रायोगिक तत्वावर याची अंमलबजावणी सुरु करण्यात येणार आहे. टोकन नंबरसाठी बुकिंग केल्यावर भाविकांना मेसेज पाठवला जाणार आहे. यापुढे पोलीस मंदिर परिसरात फिरणाऱ्या आणि भाविकांची दिशाभूल करणाऱ्या एजंटचा शोध घेऊन कारवाई करणार आहे. वारंवार कुणावर कारवाई झाली तर त्याच्या हद्दपारीसाठी जिल्हाधिकारी आणि पोलिसांना संस्थानकडून पत्र दिले जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
साई संस्थान युनिक आयडी कार्ड बनवणार
साईंच्या शिकवणुकीच्या प्रचार प्रसारासाठी साईसंस्थानने देशभर साई मंदिर उभारणीत पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थान युनिक आयडी कार्ड बनवणार असून यापूर्वी साईसमाधीवर शॉल टाकण्यासाठी सोडत पद्धत अवलबंण्यात येत होती. आता यातही मोठ्या देणगीदारांना ही संधी उपलब्ध करुन देण्याबाबत संस्थान विचार करत आहे. याशिवाय देशभरातील साईमंदिराची असोसिएशन स्थापन करण्याबाबतही साईसंस्थानचा विचार सुरु असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
हेही वाचा
Shirdi Sai Baba : साईचरणी गुरूपौर्णिमा उत्सवात कोट्यवधींची गुरूदक्षिणा; तीन दिवसांत सात कोटींचं दान
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
