(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ahmednagar Crime : पोलिसांचा धाकच नाही! राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू
Ahmednagar Crime : अहमदनगरच्या एकविरा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती.
Ahmednagar Crime : दोन दिवसांपूर्वी अहमदनगरच्या सावेडी उपनगरातील एकविरा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती. धारदार शस्त्राने वार केल्याने अंकुश चत्तर (Ankush Chattar) गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र आज उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू (Death) झाला आहे.
अहमदनगर (Ahmednagar) शहरासह जिल्ह्यातील गुंड आणि समाजकंटकांवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही, त्यामुळे अहमदनगर शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी अनेक अनुचित प्रकार घडत आहेत. अहमदनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुंडागिरीचे प्रमाण वाढले असून दोन महिन्यात एक खून (Murder) आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याच्या गंभीर घटना आणि इतर छोट्या मोठ्या मारामाऱ्या रोजच होत आहेत अशा गुंडांवर पोलिसांचा धाक उरला नसल्याचा आरोप अहमदनगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केला आहे. काल अहमदनगर शहरात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर भाजप नगरसेवकासह सात ते आठ जणांनी जीवघेणा हल्ला केला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु होतं. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात भाजपा (BJP) नगरसेवक स्वप्नील शिंदे (Swapnil Shinde) यांच्यासह सात ते आठ जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला. त्यानंतर दोन दिवसांपासून अंकुश छत्तर यांच्यावर उपचार सुरु होते, मात्र आज उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. अशा वाढत्या घटनांबाबत राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे आमदार जगताप यांनी म्हटले आहे. सोबतच पोलीस अधीक्षकांचा आपल्या प्रशासनावर वचक राहिला नाही, या गोष्टी देखील वरिष्ठांच्या कानावर घालणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे.
भाजप नगरसेवकासह चार संशयितांना अटक
अहमदनगर शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्यावर शनिवारी रात्री भाजपच्या नगरसेवक स्वप्नील शिंदे आणि त्याच्या साथीदाराने प्राणघातक हल्ला केला होता, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले अंकुश चत्तर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान या गुन्ह्यातील संशयित नगरसेवक स्वप्नील शिंदे आणि त्याच्या साथीदारांच्या मुसक्या आवळण्यात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला 48 तासाच्या आत यश आलं आहे. अंकुश चत्तर यांच्या प्राणघातक हल्ला केल्यानंतर सर्व आरोपी हे फरार झाले होते. हे आरोपी वाशीममध्ये एका लॉजवर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार संबंधित लॉजवर छापा टाकत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने स्वप्नील शिंदेसह इतर चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
अंकुश चत्तर यांच्यावरील हल्ल्याचं कारण काय?
अहमदनगर (Ahmednagar) शहरात गेल्या काही दिवसांपासून अशा घटना वाढल्या असून यामुळे नगरकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान अंकुश चत्तर यांच्यावर हल्ला नेमका कोणत्या कारणाने झाला याबाबत पोलीस तपासात माहिती समोर येणार आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळाची पाहणी करत असताना त्या ठिकाणी काही अंतरावर असलेली एक चहाची टपरी अज्ञातांनी पेटवून दिली. या घटनेचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती तोफखाना पोलिसांकडून देण्यात आली आहे.
इतर संबंधित बातम्या :
Ahmdnagar Crime : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, भाजपा नगरसेवकावर गुन्हा दाखल