Shirdi Sai Baba : साईचरणी भक्ताचं भरभरून दान, रामनवमीनिमित्त तीन दिवसांत चार कोटींचं दान
Shirdi Sai Baba : रामनवमीनिमित्त साईभक्तांनी बाबांच्या दानपेटीत देणगी स्वरुपात तीन दिवसात चार कोटी रुपयांचं विक्रमी दान अर्पण केलं.
Shirdi Sai Baba : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील (Shirdi) साईबाबा चरणी (Saibaba) तीन दिवसांत तब्बल चार कोटींचं दान (Donate) अर्पण करण्यात आलं आहे. दक्षिणा पेटीत 1 कोटी, देणगी काउंटरवर 76 लाख, 171 ग्रॅम सोनं आणि या व्यतिरिक्त 2 किलो चांदी सुद्धा साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आली आहे.
देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेले शिर्डीचे साईमंदिरात (Sai Mandir) रोजच हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. यंदा रामनवमीचा (Ramnavmi) सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. राज्यभरातील मंदिरामध्ये भाविकांची रीघ आहे. अशातच साईचरणी देखील लाखो भक्त लीन होत असून दानपेटीतही भरघोस दान दिल जात आहे. शिर्डीतील रामनवमी उत्सवाच्या काळात भाविकांनी साईचरणी कोटयवधींच दान प्राप्त झालं आहे. तीन दिवसात 2 लाखाहून अधिक भाविकांनी साई दर्शन घेतले. रामनवमी उत्सवाच्या तीन दिवसात साईबाबा संस्थानला एकुण चार कोटी नऊ लाख दान प्राप्त झालं आहे. यात दानपेटीत 01 कोटी 81 लाख 82 हजार 136 रुपये जमा झाले आहेत. तर देणगी काउंटरव्दारे 76 लाख 18 हजार 143 रुपये दान करण्यात आले आहेत.
त्याचबरोबर अनेक भाविक हे ऑनलाईन देणगी देत असतात. यात डेबीट, क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक, डीडी आणि मनी ऑर्डर आदींव्दारे 1 कोटी 41 लाख 52 हजार 812 रुपयांचं दान प्राप्त झालं आहे. यासोबत 8 लाख 64 हजारांचे 171 ग्रॅम सोने तर 01 लाख 21 हजार 813 रुपये किमतीची 2 किलो ७१३ ग्रॅम चांदीही अर्पण करण्यात आली आहे. या दाना व्यतिरिक्त उत्सव काळात सशुल्क तसेच ऑनलाईन पासेसव्दारे एकुण 61 लाख 43 हजार 800 रुपयांचे उत्पन्न संस्थानला प्राप्त झाले आहे. याबाबतची माहिती संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
समाजोपयोगी कामासाठी दानाचा उपयोग
दरम्यान साईसंस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले की, भाविकांकडून मिळालेल्या देणगीतून संस्थान विविध भक्तोपयोगी व समाजोपयोगी कामे करते. साईसंस्थानचे साईनाथ रूग्णालयात नि:शुल्क तर साईबाबा रूग्णालयात माफक दरात वैद्यकीय उपचार करण्यात येतात. मोठ्या आजारांसाठी गोरगरीब रूग्णांना वैद्यकीय अनुदान देण्यात येते. प्रसादालयात मोफत अन्नदान करण्यात येते. वर्षाकाठी जवळपास दीड कोटी भाविक याचा लाभ घेतात. संस्थानच्या शैक्षणिक संकुलात सहा हजार विद्यार्थी नाममात्र दरात ज्ञानार्जन करत आहेत. भाविकांना माफक दरात निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय व नैसर्गिक आपत्तीतही संस्थान मदत करते. संस्थानात जवळपास सहा हजार कर्मचारी आहेत.