Madhi Kanifnath Yatra : पाथर्डीतील मढी कानिफनाथ यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांवर बंदी, ग्रामस्थांचा मोठा निर्णय
Kanifnath Mandir Madhi : मुस्लिम व्यापारी गावकऱ्यांच्या परंपरा पाळत नाहीत, त्यामुळे भाविकांच्या भावनांना ठेच लागते असं सांगत ग्रामस्थांनी मुस्लिम व्यापाऱ्यांवर यात्रेमध्ये बंदी घातली आहे.

अहिल्यानगर : जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या मढी कानिफनाथ महाराजांच्या यात्रेमध्ये (Kanifnath Mandir Madhi Yatra) मुस्लिम समाजाच्या व्यवसायिकांना बंदी घालण्याचा ठराव करण्यात आला आहे. हा ठराव ग्रामस्थांनी पारित केला आहे. यात्रेचा काळ हा आमच्यासाठी दुखवट्याचा काळ असतो, मात्र मुस्लिम व्यापारी आमच्या परंपरा पाळत नाहीत आणि त्यामुळे भाविकांच्या भावनांना ठेच पोहोचते असं ग्रामस्थांचं मत आहे. होळीपासून मढीच्या यात्रेला सुरवात होते तर गुडीपाडव्याला सांगता होत असते.
पारंपरिक पद्धतीनुसार महिनाभरापूर्वी देवाला तेल लावलेले असते आणि हा कालावधी ग्रामस्थांच्या दृष्टीकोनातून दुखावट्याचा असतो. या कालावधीमध्ये ग्रामस्थ तेलातील तळलेले पदार्थ खात नाहीत. पलंग, गादी वापरत नाहीत. एकूणच ग्रामस्थ या काळात दुःखवटा पाळतात. मात्र असं असताना देखील येथे येणारे मुस्लिम व्यापारी परंपरा पाळत नाही. त्यामुळे गावकऱ्यांच्या भावनेला ठेच पोहचत असल्याचं सांगत ग्रामस्थांनी हा ठराव पारित केला आहे.
मुस्लिम व्यापारी परंपरा पाळत नाहीत
या प्रकरणी सरपंच आणि कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय बाजीराव मरकड यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, एक महिन्यावर कानिफनाथांची यात्रा आली आहे. त्यामुळे बऱ्याचशा भाविकांच्या भावना तीव्र आहेत. या यात्रेमध्ये बहुसंख्य व्यापारी हे मुस्लिम असतात आणि ते आमची परंपरा पाळत नाहीत. त्यावर चर्चा झाली. या काळात महिनाभर देवाला तेल लावलेलं असतं. हा दुखवट्याचा कालावधी असल्याने या काळात आम्ही कोणतेही शुभ कार्य करत नाही, शेतीची कामं करत नाही. तेलात तळलेले पदार्थ खात नाही. गादी आणि खॉटही वापरत नाही. पण गावात आलेले मुस्लिम व्यापारी मात्र ही परंपरा पाळत नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांच्या भावनांना ठेच लागते.
कुंभमध्ये जसे मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहेत तशाच प्रकारे आम्ही मढी कानिफनाथांच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे असं सरपंच म्हणाले.
भाविकांच्या तक्रारीनुसार ठराव मांडला
सरपंच संजय बाजीराव मरकड म्हणाले की, जे लोक स्वतः कुंकू लावत नाहीत ते लोक आम्हाला कुंकू विकतात ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. मुस्लिम व्यापाऱ्यांचे या ठिकाणी दोन नंबरचे धंदे सुरू असतात. त्यांच्याकडून भाविकांची लूट होते. या आधी भाविकांना मारहाणही करण्यात आली होती. अशा भाविकांनी, ग्रामस्थांनी आमच्याकडे पत्रं लिहित मुस्लिम व्यापाऱ्यांवर बंदी आणावी अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार आता कानिफनाथांच्या यात्रेमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
