Kiran Lahamate : आधी म्हणाले, याचा हिशोब होणार, आता अजितदादांच्या आमदाराचा यू टर्न; म्हणाले, लाठीचार्ज नाही, फक्त...
Kiran Lahamate Programme : अहिल्यानगरमध्ये आदिवासी दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं.

अहिल्यानगर : आदिवासी दिनानिमित्त अकोलेमध्ये झालेल्या कार्यक्रमाची आणि राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा होत आहे. कार्यक्रमावेळी जमलेल्या आदिवासी बांधवांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप किरण लहामटे यांनी केला होता. आता त्यांनी यावरुन यू टर्न घेतल्याचं दिसून आलं. तो लाठीचार्ज नव्हता, फक्त एकनाथ शिंदेंना जाण्यासाठी पोलिसांनी मार्ग करुन देण्यासाठी आदिवासी बांधवांना बाजूला लोटलं होतं असं लहामटे म्हणाले. किरण लहामटे यांनी घेतलेल्या या यू टर्नची चर्चा आता जोरदार रंगली आहे.
अहिल्यानगरमधील अकोलेमध्ये आदिवासी दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांच्या वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शिंदेंचे भाषण सुरू असताना लहामटे यांच्या कार्यक्रमातील डीजेचा आवाज येत होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या परतीचा मार्ग मोकळा करताना पोलिसांनी लहामटे यांच्या कार्यक्रमात जमलेल्या आदिवासींवर लाठीचार्ज केल्याचा आरोप खुद्द लहामटे यांनी केला होता.
नेमकं काय म्हणाले होते किरण लहामटे?
आदिवासी बांधवांना कुणाचीही भीती नाही. तुमच्या प्रशासनाने आदिवासींवर लाठीचार्ज केला, पण आम्ही सयंमाने घेतलं. कारण आम्हाला माहिती आहे, एवढी मोठी संख्या आहे आणि इथे काहीही होऊ शकतं. तुम्ही चुकले असला तरी आम्ही चुकणार नाही. पण याचा हिशोब होणार.
लहामटेंचा यू टर्न
आमदार किरण लहामटे यांनी शनिवारी केलेल्या वक्तव्यावरुन यू टर्न घेतल्याचं दिसून आलं. शनिवारी आदिवासी बांधवांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा त्यांनी आरोप केला होता. त्यानंतर रविवारी त्यांनी यू टर्न घेतला. लाठीचार्ज झाला नाही, पण रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिसांनी आदिवासी बांधवांना लोटल्याचं ते म्हणाले.
Kiran Lahamate VIDEO : नेमकं काय घडलं?
अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी बहुल असणाऱ्या अकोले तालुक्यात शनिवारी आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी दोन वेगवेगळे आदिवासी दिन साजरे केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीनंतर बाजार तळ या ठिकाणी सभा संपन्न झाली. मात्र याचवेळी सभा सुरू असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांची रॅली देखील त्या परिसरातून जात होती. एकीकडे शिंदे यांचे भाषण सुरू असताना डीजेचा आवाज देखील येत होता. त्यावेळी एकनाथ शिंदेंनी भाषणात याचा उल्लेख देखील केला.
मात्र याच दरम्यान भाषण संपल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परतीचा मार्ग तोच असल्याने पोलिसांनी रस्ता मोकळ्या करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. याच दरम्यान पोलिसांनी त्या ठिकाणी जमलेल्या आदिवासींवर लाठीचार्ज केल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केलं. मात्र हा लाठीचार्ज झाला नसून रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याचं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी स्पष्ट केलं. मला सांगितलं असतं तर रस्ता मोकळा करून दिला असता असं सांगत लहामटेंनी पोलिसांच्या कृत्याचा निषेध व्यक्त केला.
ही बातमी वाचा:























