भापजने रोहित पवारांचे 12 पैकी 8 नगरसेवक फोडले, कर्जत नगरपंचायतीत राम शिंदेंची सत्ता; नगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव नाट्य कसं रंगलं?
Karjat Nagar Panchayat : तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी 17 पैकी 12 नगरसेवक निवडून आणले होते. त्यामधील 8 नगरसेवक आता भाजपसोबत गेले आहेत.
अहिल्यानगर: कर्जत नगरपंचायतमध्ये नगराध्याक्षावरील अविश्वास ठरावावरून चांगलेच राजकारण तापले. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यावर मविआच्या 11 आणि भाजपच्या 2 नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणला. त्यावरून आमदार रोहित पवार आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यात चांगलेच आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
अहिल्यानगरची कर्जत नगरपंचायत ही 17 नगरसेवक असलेली नगरपंचायत. 2022 मध्ये नगरपंचायतची निवडणूक झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसला 12, काँग्रेसला 3 तर भाजपला फक्त 2 नगरसेवक निवडून आणता आले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी झाली आणि नगरपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात आली. मात्र तीन वर्षानंतर पुन्हा एकदा ती भाजपच्या ताब्यात जाणार आहे.
रोहित पवारांचे 8 नगरसेवक फुटले
नगरपंचायत निवडणुकीत ज्याप्रमाणे नाट्यमय घडामोडी करत रोहित पवार यांनी भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी दिली, त्याच प्रकारच्या घडामोडी मागील पंधरा दिवसांपासून भाजपकडून केल्या जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 पैकी 8 नगरसेवक आणि काँग्रेसचे 3 नगरसेवक भाजपच्या गोठात दाखल झाले. 7 एप्रिल रोजी भाजपच्या 2 आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडलेल्या 11 अशा 13 जणांनी नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला.
पवार-शिंदेंमध्ये कलगीतुरा
यानंतर काही दिवसातच राज्य मंत्रिमंडळाने नगराध्यक्षांना पदावरून हटवण्याचा अधिकार नगरसेवकांना दिल्याचा अध्यादेश काढला. यावरून आमदार रोहित पवार आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या चांगलाच कलगीतुरा रंगला. आरोप-प्रत्यारोप झाले. कर्जत नगरपंचायत मिळवण्यासाठी राज्याचा कायदा बदलला अशी टीका रोहित पवारांनी केली. तर राम शिंदे यांनीही रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
नगराध्यक्षांनी राजीनामा दिला
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी 13 नगरसेवकांनी नवीन अध्यादेशाप्रमाणे पुन्हा नगराध्यक्ष राऊत यांच्यावर अविश्वासाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्त केला. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभा घेऊन निर्णय करण्याचा आदेश प्रांत अधिकाऱ्यांना दिला.
दरम्यान सहलीसाठी गेलेले, फुटलेले नगरसेवक अगदी बंदोबस्तात खासगी बसमधून कर्जतमध्ये दाखल झाले. मात्र कर्जत नगरपंचायतमध्ये सभा सुरू होण्याआधीच नगराध्यक्ष उषा राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे सर्वसाधारण सभा न होता पिठासन अधिकाऱ्याने नगराध्यक्ष उषा राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा दिल्याची माहिती नगरसेवकांना दिली.
पैसे आणि पदाचा वापर करुन दबाव
उषा राऊत यांनी राजीनामा देत असताना आपल्या वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचं म्हटलं. मात्र माध्यमांशी बोलताना उषा राऊत यांनी थेट सभापती राम शिंदे यांच्यावर आरोप केला. पैसे आणि सत्तेच्या दबावात नगरसेवकांना अविश्वास ठराव आणण्यास भाग पाडलं असल्याचा आरोप त्यांनी आहे. सोबतच एका ओबीसी महिलेला पदावरून काढण्यासाठी पदाचा दुरुपयोग केल्याचं म्हटलं आहे.
उषा राऊत यांनी आरोप केल्यानंतर भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर दिले. राऊत यांच्याकडून राम शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपाचे खंडन केले. नगरसेवकांच्या कोण किती विनवण्या करत होतं आणि कोण कुणाला आमिष दाखवत होतं याचे सगळे पुरावे आमच्याकडे असल्याचं भाजपने म्हटलं. आमच्याकडील पुरावे वेळेप्रसंगी बाहेर काढू असं आव्हान भाजप नेत्यांनी दिलं.
नगराध्यक्षा उषा राऊत यांनी ठरल्याप्रमाणे अडीच वर्षात राजीनामा दिला असता तर हा प्रकार घडलाच नसता. आम्हाला कुणीही पैशाचे आमिष दाखवलेले नाही असं भाजपसोबत गेलेल्या नगरसेवकांनी स्पष्ट केलं.
सन 2022 मध्ये झालेल्या निवडणुकीत मोठ्या प्रयत्नाने आमदार रोहित पवारांनी कर्जत नगरपंचायत आपल्या ताब्यात मिळवली. त्यासाठी भाजपच्या नगरसेवकांना आपल्यासोबत घेत राष्ट्रवादीतून उमेदवारी करायला लावली. मात्र त्यातील नगरसेवक पुन्हा एकदा भाजपच्या तंबूमध्ये दाखल झाल्याने रोहित पवार यांना राम शिंदे यांनी मोठा धक्का दिल्याची चर्चा कर्जतसह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रंगली आहे. यावरून भविष्यात देखील राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात राजकारण रंगणार यात शंका नाही.























