HSC Paper Leak Case: बारावी पेपरफुटीचं नगर कनेक्शन; रुई छत्तीसीमधून मुख्याध्यापकांसह पाच जणांना अटक
HSC Paper Leak Case: बारावी गणित पेपरफुटी प्रकरणात मुख्याध्यापकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
Buldhana HSC Paper Leak Case: बारावीच्या पेपरफुटीचं कनेक्शन आता अहमदनगरपर्यंत (Ahmednagar News) पोहचलं आहे. बारावीचा गणिताचा पेपर फुटला (HSC Paper Leak Case) होता. या प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील रुई छत्तीसी (Rui Chhattishi) येथील आनंद इंग्लिश विद्यालयातील मुख्याध्यापकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचे छायाचित्र काढून व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून पाठवून प्रत्येकी 10 हजार रुपये घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी किरण संदीप दिघे, अर्चना बाळासाहेब भामरे, भाऊसाहेब लोभाजी अमृते, वैभव संजय तरटे, सचिन दत्तात्रय महारनवर यांना अटक केली आहे. या प्रकरणी दादर येथील अँटॉनिओ डिसिल्वा हायस्कूलमधील शिक्षिकेच्या तक्रारीवरून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या तपासात दादरमधील विद्यार्थ्यांला मिळालेली प्रश्नपत्रिका ही नगरमधील आरोपींकडून मिळाल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकांसह दोन शिक्षक, एक चालक आणि शाळा मालकाच्या मुलीला अटक करण्यात आली आहे.
पेपरफुटी प्रकरणातील चार आरोपी शिक्षकांचं निलंबन
बुलढाण्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील बारावी गणित पेपर फुटीच्या प्रकरणात अटक केलेल्या सात आरोपींमध्ये सहभाग असलेल्या चार शिक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी ही कारवाई केली आहे. निलंबनाची कारवाई केलेले सर्व शिक्षक हे विनाअनुदानित शाळांमध्ये कार्यरत होते. कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी प्रश्नपत्रिका व्हायरल केल्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये गजानन आडे आणि गोपाल शिंगणे हे दोघे स्वतःच्याच शिक्षण संस्थांचे संचालक असून, तिथेच शिक्षक म्हणून कार्यरत होते. तर अ. अकील अ. मुनाफ हा जाकीर हुसेन उर्दू स्कूल, लोणार येथे प्राचार्य होता आणि अंकुश चव्हाण हा सेंट्रल पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे कार्यरत होते.
चौकशीसाठी एसआयटीची स्थापना
बुलढाणा पेपरफुटी प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांनी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. या SIT पथकात एक वरिष्ठ अधिकारी, दोन अधिकारी तर चार कर्मचारी आहेत. या पथकाचं नेतृत्व मेहकरचे पोलिस उपअधीक्षक विलास यमावार हे करणार आहेत. पोलीस उपअधीक्षक विलास यामावार हे पोलिस अधिकारी होण्यापूर्वी बारा वर्ष शिक्षक होते. त्यामुळे त्यांना या क्षेत्रातील दांडगा अनुभव असल्यानं तात्काळ म्हणजे, 36 तासात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. त्यात चार हे खासगी शाळेतील शिक्षक आहेत. या खासगी शाळेतील शिक्षकांचा पेपरफुटीत सहभाग निष्पन्न झाल्याने आता या शाळेतील इतर कुणाचा सहभाग पेपरफुटीत आहे का? याची चौकशी SIT करणार आहे. शिवाय या पेपरफुटीचं कनेक्शन राज्यातील इतर ठिकाणी आहे का? मुंबईत एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये हाच पेपर आढळला होता. त्याचा याच्याशी संबंध आहे का? याची देखील चौकशी सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI