Arun Jagtap passes away : संग्राम जगताप यांना पितृशोक, माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन, नगरकरांचे 'काका' हरपले!
Arun Jagtap passes away : अहिल्यानगरचे माजी नगराध्यक्ष आणि विधान परिषदेचे दोन टर्म सदस्य अरुण जगताप यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

Arun Jagtap passes away : अहिल्यानगरचे माजी नगराध्यक्ष आणि विधान परिषदेचे दोन टर्म सदस्य अरुण जगताप (Arun Jagtap) यांचे शुक्रवारी (दि. 2) अल्पशा आजाराने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले आहे. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने अहिल्यानगरसह संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांचे ते वडील होते.
अरुण जगताप यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या सारसनगर येथील राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार अहिल्यानगर येथील स्मशानभूमीत करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यातील एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना तातडीने पुण्यात दाखल करण्यात आले होते.
संग्राम जगताप यांना पितृशोक
ही माहिती समजताच अरुण जगताप यांच्या समर्थकांनी पुण्याकडे धाव घेतली होती. त्यामुळे रुग्णालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अरुण जगताप यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याने त्यांना भेटण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे नागरिकांनी नगरहून पुण्यात येऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केले होते. अरुण जगताप हे नगरच्या राजकारण आणि समाजकारणात "काका" या नावाने परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी पार्वती, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले हे त्यांचे व्याही होत.
अरुण जगताप यांची राजकीय कारकीर्द
अरुण जगताप यांची राजकीय कारकीर्द काँग्रेस पक्षातून सुरू झाली. त्यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले असून, अहमदनगर नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी यशस्वी कारकीर्द पार पाडली. ते अहमदनगर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होते, तसेच गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचेही अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अरुण जगताप सलग दोन वेळा स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधानपरिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यांच्या निधनामुळे नगरच्या राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली
दरम्यान, माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या दुःखद निधनानं राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेलं, सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष, प्रयोगशील शेतकरी, वारकरी संप्रदायाचा सच्चा पाईक म्हणून ते कायम अहिल्यानगरवासियांच्या लक्षात राहतील. त्यांचे निधन ही अहिल्यानगर जिल्ह्याची मोठी आणि असून त्यांच्या निधनाचा धक्का पचवण्याची शक्ती त्यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप, संपूर्ण जगताप कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांना मिळो, अशी प्रार्थना करतो. आम्ही सर्वजण जगताप कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. दिवंगत अरुणकाकांच्या आत्म्यास सद्गती लाभो, ही प्रार्थना, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अरुणकाका जगताप यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.
आणखी वाचा























