Nilesh Lanke : तुतारी फुंकू की नवी वेळ असलेलं तेच घड्याळ घेऊ? प्रतिज्ञापत्र अजित पवारांना, पोस्टरवर शरद पवार; निलेश लंके अजूनही 'डबल रोल'मध्ये?
Ahmednagar South Lok Sabha Election : राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी एकीकडे अजित पवार गटाला प्रतिज्ञापत्र दिलं असलं तरीही दुसरीकडे त्यांच्या पोस्टर्सवर मात्र शरद पवारांचाही फोटो झळकत आहे.

अहमदनगर : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गटात कोण आणि शरद पवार गटात कोण आमदार आहेत हे आतापर्यंत स्पष्ट झालं आहे. असं असलं तरी लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मात्र काही गणितं बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरमध्येही असंच काहीचं चित्र दिसत आहे. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आपण अजित पवार गटात असल्याचं प्रतिज्ञापत्र दिलं असलं तरीही त्यांच्या पोस्टर्सवर मात्र शरद पवारांचा फोटो लागल्याचं दिसत आहे. लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या लंके यांनी दोन्ही गटांना जवळ केलंय. त्यामुळे आमदार निलेश लंके अजूनही डबल रोलमध्ये असल्याचं दिसून येतं आहे.
निलेश लंके यांची भुमिका दोन्हीं गटांना साजेशी
आमदार निलेश लंके यांच्या मतदारसंघातील विकासकामांच्या उद्धाटनाचे पोस्टर्स सोशल मीडियावर फिरत आहेत. त्या पोस्टर्सवर शरद पवार यांच्यासोबत अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांचे फोटो लावण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
निलेश लंके आगामी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने सध्या तरी दोन्हीं गटाचे पर्याय खुले ठेवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
राणीताई लंके लोकसभेच्या रिंगणात?
भाजपच्या सुजय विखेंच्या विरोधात आता राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके निवडणूक लढवणार अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. त्याचं कारण म्हणजे वेगवेगळ्या कार्यक्रमात त्यांचे बोर्ड झळकायला सुरूवात झाली आहे. तसेच एकाच घरात दोन मतप्रवाह असू शकतात असं सूचक वक्तव्य निलेश लंके यांनी केलं होतं. त्यामुळे राणीताई लंके यांनी लोकसभेची तयारी सुरू केली असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
सध्या भाजप आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट हा महायुतीत सत्तेत आहे. मात्र तरी देखील कधी निलेश लंके तर कधी राणीताई लंके यांच्या लोकसभा उमेदवाराची उमेदवारीची चर्चा रंगत असते. याबाबत बोलताना स्वतः राणीताई लंके यांनी हे बॅनर कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत, त्यांच्या मनात ज्या भावना आहेत त्याचा नक्कीच विचार होईल अशी प्रतिक्रिया दिली होती.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
