Ajit Pawar : अजितदादांकडून रोहित पवारांचा 'उपटसूंभ' उल्लेख, कुणाच्याही प्रश्नाला उत्तर देण्यास बांधिल नसल्याचं स्पष्ट
Ajit Pawar On Rohit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचं वक्तव्य आमदार रोहित पवारांनी केलं होतं. त्यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अहिल्यानगर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांचा उपटसूंभ असा उल्लेख केला आहे. रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, कुणीही उपटसूंभ उठेल आणि काहीही विचारेल, मी त्याला उत्तर द्यायला बांधिल नाही. तसेच माणिकराव ठाकरेंच्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री आणि आम्ही ठरवू असंही ते म्हणाले. अहिल्यानगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण अजित पवारांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान हे जगातलं सर्वोत्तम संविधान म्हणून ओळख आहे. त्यांनी सर्वांना दिलेल्या न्यायाचे स्मरण अहिल्यानगर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामुळे होत राहील असं अजित पवार म्हणाले.
कुणी फुकटचा सल्ला देऊ नये
रोहित पवारांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात दोन गट पडल्याचे म्हटले होते. तसेच मूळ राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला पुन्हा चिन्ह परत मिळेल असंही रोहित पवारांनी म्हटलं होतं. त्यावर अजित पवार म्हणाले की, "आमच्या पक्षात किती गट आहे ते आमचं आम्ही बघू, इतरांनी फुकटचा सल्ला देण्याचं कारण नाही. कोण काय बोलतं याच्याशी मला काही देणंघेणं नाही. महाराष्ट्रात कोणीही उपटसूंभ उठेल आणि काहीही प्रश्न विचारेल. त्याला उत्तर द्यायला मी काही बांधिल नाही."
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा कधी?
माणिकराव कोकाटे यांबाबत काय आणि कधी निर्णय होणार? याबद्दल विचारले असता अजित पवार म्हणाले की, काय निर्णय घ्यायचा या संदर्भात कुणाला सांगण्याचं कारण नाही. ज्यावेळेस मी निर्णय घेईन त्यावेळेस जाहीर करेन. आमचे निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि आम्ही ठरवू, कारण मंत्रिमंडळात कोण असावं, कोण नसावं, कुणाचं खां कुणाकडे असावं हे ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे.
धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेणार?
धनंजय मुंडे यांचे मंत्रिमंडळात पुन्हा आगमन होईल का असे विचारले असता अजित पवार म्हणाले की, "धनंजय मुंडेंवर कृषी खात्यासंदर्भात जे आरोप होते त्यामध्ये हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे. न्यायालयीन चौकशी देखील राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. त्याचा अहवाल आलेला नाही. त्यामुळे मंत्रिपदाबाबत निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील."
लाडकी बहीण योजनेचा काहींनी गैरफायदा घेतला
लाकडी बहीण योजनेचा लाभ पुरुषांनी घेतल्याचे समोर आलं आहे. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, "ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे अशा गरिबांसाठी ही योजना आहे. परंतु काहींनी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये काही नोकरदार भगिनी पण होत्या अशीच आमची माहिती आहे. तसेच पुरुषांनी देखील लाभ घेतला असल्याचं बोललं जातंय. असा कोणी फायदा घेतला असेल तर तो वसुल करण्याच्या दृष्टीने काय पाऊल उचलायची ते उचलू."
ही बातमी वाचा:
























