Ahmednagar: अहमदनगरच्या अकोले तालुक्यात धावतायत अवघ्या 38 एसटी, पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या गावाला फटका
ST Service: कोरोना पूर्व काळात अकोले आगारात 63 बसेस धावत होत्या, आता केवळ 38 बसेस धावत आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील आदिवासी, विद्यार्थ्यांची गैरसोय होतेय.
अहमदनगर : आदिवासी आणि दुर्गम भाग असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बससेवा विस्कळित झाली असून अवघ्या 38 बसेस अकोले आगारात उपलब्ध आहेत. अपुऱ्या बससेवेमुळे अनेक गावांच्या बस फेऱ्या बंद करण्यात आल्या असून यात पद्मश्री पुरस्कार प्राप्त राहीबाई पोपेरे यांच्या कोंभाळणे गावाचा देखील समावेश आहे.
ग्रामीण भागात लालपरी हे दळणवळणाचं मुख्य साधन समजलं जातं. ज्या ठिकाणी कोणतीच व्यवस्था नसते त्या ठिकाणी एस.टी. बसमुळे सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थाना फायदा होतो. मात्र कोरोनापूर्वी 63 बसेस असणाऱ्या अकोले आगारात आज अवघ्या 38 बसेस उपलब्ध आहेत. त्यामुळे दुर्गम भाग असणाऱ्या अनेक गावांत आज बससेवा पूर्णपणे बंद करण्याची वेळ एस.टी. प्रशासनावर आली आहे. फोफसंडी, बदगी, पाचपट्टा या दुर्गम गावांसह पद्मश्री पुरस्कार प्राप्त राहीबाई पोपेरे यांच्या कोंभाळणे गावात सुद्धा एस. टी.ची सेवा बंद असल्याची माहिती अकोले आगारप्रमुख ज्ञानेश्वर आव्हाड यांनी दिली आहे.
कोरोना संपला, मात्र आजही बस सेवा उपलब्ध नसल्याने अकोले तालुक्यातील गावातील नागरिकांना मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मिळेल त्या वाहनाने प्रवास करण्याची वेळ अनेकांवर आलीय. तर खुद्द पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना सुद्धा उपचार घेण्यासाठी दुचाकीवरून जावं लागलं. महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थांच्या प्रवासाची सोय व्हावी अशी मागणी आता राहीबाई पोपेरे यांनी केली आहे.
एकीकडे रस्त्यांची दुरावस्था, त्यातच बससेवा सुद्धा बंद अशी परिस्थिती अकोले तालुक्यातील अनेक गावात निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने याची दखल घेत बससेवा सुरळीत करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आता नागरिकांची ही मागणी मान्य होते का हे आगामी काळात स्पष्ट होईल.
राज्य परिवहन मंडळात येणार 5 हजार इलेक्ट्रिकल बसेस
कोरोनात काळातील बंद असलेल्या बससेवा, तसेच त्यानंतर सुरू झालेल्या संपामुळे एसटी महामंडळाचं मोठं नुकसान झालं. त्यातून आता सावरायचा प्रयत्न एसटी महामंडळ करत आहे. राज्य सरकार देखील यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य परिवहन मंडळासाठी 5150 इलेक्ट्रिकल बसेस येणार आहेत. त्याचबरोबर 5000 डिझेल बसेसचे सीएनजीवर रुपांतर केलं जाणार आहे. एशियन डेव्हलपमेंट बँक यासाठी राज्याला सहकार्य करणार आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे शिष्टमंडळ सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहे.