Ahmadnagar : राहुरी गुहा येथील कानिफनाथ मंदिरातील जमाबंदी आदेश मागे, ग्रामस्थांच्या आक्रमकतेनंतर प्रशासनाचा निर्णय
Ahmednagar News Update : अहमदनगर जिल्ह्यातील गुहा गावात प्रशासनाने कानिफनाथ मंदिरात लागू केलेला जमावबंदी आदेश मागे घेतला आहे.
Ahmednagar News Update : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी गुहा येथील कानिफनाथ मंदिर येथील जमावबंदी आदेश अखेर तहसीलदारांनी मागे घेतला आहे. तहसीलदारांच्या या निर्णयामुळे ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील गुहा गावात प्रशासनाने कानिफनाथ मंदिरात अचानक जमावबंदी आदेश लागू केल्याने ग्रामंस्थामध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे गुहा ग्रामस्थांनी राहुरी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढत दोन तास ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. आंदोलकांच्या घोषणाबाजीमुळे तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. अखेर जनभावनेचा आदर करत प्रशासनाने जमावबंदीचा आदेश मागे घेतला आहे. तसेच आरती , दर्शन आणि धार्मिक परंपरा साजऱ्या करण्यासाठी ग्रामस्थांना परवानगी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
राहुरी तालुक्यातील गुहा गावात शेकडो वर्षांपासून कानिफनाथ महारांजाच्या मंदिरात भाविक गुरूवारी आरती करत असतात. काल मात्र प्रशासनाने अचानक जमावबंदीचा आदेश लागू केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. गेल्या काही दिवसांपासून कानिफनाथ मंदिर आणि मशिद अशी न्यायालयीन लढाई सुरू असताना अचानक जमावबंदीचे आदेश दिल्याने प्रशासनाविरोधात ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढत प्रशासनाला आपल्या मागण्या मान्य करण्याची विनंती केली. यावेळी जनभावनेचा आदर करत प्रशासनानेने हा निर्णय मागे घेतला आहे.
Kanifnath Protest : काय आहे नेमका वाद ?
कानिफनाथ मंदिराच्या नावे असलेली चाळीस एकर जमीन कोणालाही कल्पना न देता परस्पर वक्फ बोर्डाकडे हस्तांतरित करण्यात आली आणि कागदोपत्री कानिफनाथ मंदिर नाव हटवून हजरत रमजान बाबा दर्गा असा उल्लेख करण्यात आल्याने न्यायालयीन लढा सुरू झाला. न्यायालयाचा कोणताही निकाल नसताना कानिफनाथ मंदिरात हिंदू बांधवांना प्रशासनाने आरती करण्यापासून रोखल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. पूजा आणि आरती करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी करत नागरिकांनी आंदोन केले होते. तहसीलदारांच्या जमावबंदी आदेश मागे घेण्याच्या निर्णयामुळे अखेर ग्रामस्थांच्या लढ्याला यश आले आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, गुहा गावातील कानिफनाथ मंदिरात जमावबंदी आदेश लागून केल्यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. या आंदोलनात गावारीत असंख्य नागरिक सहभागी झाले होते. प्रशानाच्या विरोदात घोषणाबाजी करत ग्रामस्थांनी जमावबंदीचा आदेश मागे घेण्याची मागणी केली होती. ग्रामस्थांच्या मागणीनंतर प्रशासनाने आज जमावबंदीचा आदेश मागे घेतला.