Nagpur Covid Update : मंगळवारी जिल्ह्यात 273 नवे कोरोनाबाधित, 26 दिवसांत 10 कोरोना बळी
नागपुरबाहेरच्या मृत्यूची नागपुरात नोंद होत नसल्याने मृत्यूच्या आकड्यात वाढ दिसत नाही. सध्या जिल्ह्यात 1569 सक्रिय बाधित असून यापैकी शहरात 1070 आणि ग्रामीणमध्ये 499 पॉझिटिव्ह आहेत.
नागपूरः देशभरात कोरोना वाढत असताना रुग्णसंख्येने नागपूर जिल्ह्यातही डोके वर काढले आहे. मंगळवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 273 नवे कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये शहरातील 178 आणि ग्रामीणमधील 95 बाधितांचा समावेश आहे. तर 200 कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यातील सक्रिय बाधितांची संख्या 1569 वर पोहोचली आहे.
चाचण्यांच्या तुलनेत कोरोना बाधितांची टक्केवारी वाढत असताना प्रशासनाच्यावतीने कोरोनाला गांभिर्याणे घेण्यात येत नसल्याचे परिस्थितीवरुन दिसून येत आहे. कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना चाचण्यांची संख्या अल्प दिसून येत आहे. दुसरीकडे बाधितांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्याची गरजही पडत आहे. सध्या 74 बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 1495 बाधित गृहविलगीकरणात आहेत.
मृतकांपैकी दोघे नागपूर जिल्ह्यातील
जिल्ह्यात मागील 26 दिवसांत 10 कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे. मृतकांपैकी 2 नागपूर जिल्ह्यातील आहेत. भंडारा येथील महिलेचा मेडिकलमध्ये कोरोना वॉर्डात रविवारी मृत्यू झाला आहे.
20 जुलै ते 24 जुलै दरम्यान दररोज एक मृत्यू
20 जुलै रोजी 59 वर्षीय व्यक्तीचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. तर 21 जुलै रोजी 47 वर्षीय महिला मेडिकलमध्ये दगावली. 22 जुलै रोजी 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. 23 जुलै रोजी 42 वर्षीय दिल्लीच्या अभियंत्याचा खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. तर 24 जुलै रोजी 36 वर्षीय भंडारा येथील महिलेचा मेडिकलमध्ये मृत्यू झाला.
म्हणून मृत्यूच्या आकड्यातील वाढ नाही
मागील 26 दिवसांत दगावलेल्या 10 जणांपैकी 2 जण नागपूर जिल्ह्यातील आहे. एक शहरातील तर दुसरा ग्रामीण भागातील आहे. नागपुरबाहेरच्या मृत्यूची नागपुरात नोंद होत नसल्याने मृत्यूच्या आकड्यात वाढ दिसत नाही. सध्या जिल्ह्यात 1569 सक्रिय बाधित असून यापैकी शहरात 1070 आणि ग्रामीणमध्ये 499 पॉझिटिव्ह आहेत. आज जिल्ह्यात करण्यात आलेल्या 1784 आरटीपीसीआर चाचण्यांपैकी 1360 शहरातील तर 424 ग्रामीमधील आहेत.