Pathaan Review : शाहरुख खानचा 'पठाण' कसा आहे? वाचा रिव्ह्यू...
Pathaan Review : शाहरुखचे चाहते असाल, अॅक्शन फिल्म्स, स्पाय फिल्म्स तुम्हाला आवडत असतील तर 'पठाण' हा सिनेमा
Siddharth Anand
शाहरुख खान, दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम
Pathaan Movie Review : खरं तर यशराज सारखं बॅनर, शाहरुख खानसारखा (Shah Rukh Khan) सुपरस्टार आणि तब्बल अडीचशे कोटींचं बजेट असं जर कॉम्बिनेशन असेल तर आपल्या अपेक्षा नक्कीच वाढलेल्या असतात. कदाचित याच गोष्टीचा दबाव निर्मात्यांनी घेतला आणि असेल नसेल ते सगळं एकाच सिनेमात ओतलं. त्यामुळं झालं असं की 'पठाण' (Pathaan) ओव्हरडोस बनून आपल्या समोर येतो.
अॅक्शन उत्तम आहे, व्हिएफएक्स चांगले आहेत. पण म्हणून ते इतके नसावेत की आपण गोष्टच विसरुन जाऊ. कथेत ट्विस्ट आहेत. पण ते इतके असू नयेत की प्रेक्षकांचा गोंधळ उडावा आणि नेमकं हेच 'पठाण'च्या बाबतीत घडलंय.
स्पाय फिल्मसाठी आवश्यक असणारा सगळा मसाला या सिनेमात आहे. कथेत ट्विस्ट आहेत, तगडा हिरो आहे, त्याला प्रेमात पाडणारी दीपिका सारखी नायिका आहे, खतरनाक खलनायक आहे आणि त्याहून खतरनाक अॅक्शन आहे. पण तरीही 'पठाण' आपल्याला गुंतवून ठेवू शकत नाही. कारण ते सारं कमाल प्रमाणात आहे.
शाहरुखसाठी हा सिनेमा खूप महत्वाचा होता. त्यामुळे त्यानं जीव तोडून काम केलं आहे. ज्या लेव्हलची अॅक्शन त्यानं या सिनेमात केली आहे ती करणं अजिबात सोपं नव्हतं. पण त्यानं प्रचंड मेहनतीतून ते घडवून आणलं आहे.
दीपिकाच कॅरॅक्टर गोष्टीत ट्विस्ट आणण्यासाठी आहे. तिनं ते छान पेललं आहे. काही अॅक्शन सीन्स तिनेही उत्तम केलेत. जॉनसाठी हा सिनेमा म्हणजे होम पिचवर बॅटिंग करण्यासारखा होता. त्यामुळं शाहरुख समोर असतानाही जॉन आपलं लक्ष जास्त वेधून घेतो.
टेक्निकली 'पठाण' हा सिनेमा श्रीमंत आहे. कॅमेरा, संकलन, व्हिएफएक्स हे सगळंच. पण तरीही सिनेमा म्हणून 'पठाण' तेवढा परिणामकारक होत नाही. कारण यातल्या प्रत्येकानं आपआपल्या पातळीवर उत्तम काम केलं आहे. सिनेमा म्हणून त्याकडे पाहाताना ते अतिरेकी वाटतं. त्यामुळं दिग्दर्शकानं साऱ्या गोष्टी नियंत्रित पद्धतीनं कशा मांडता येतील याकडे जास्त लक्ष द्यायला हवं होतं, असं मला वाटतं.
शेवटी एवढंच सांगेन की, तुम्ही शाहरुखचे चाहते असाल, अॅक्शन फिल्म्स, स्पाय फिल्म्स तुम्हाला आवडत असतील तर पठाण पाहू शकता. या सिनेमाला मी देतोय तीन स्टार्स.